गावठी पिस्तूलातून गोळी सुटून मुलगा ठार

0

अहमदनगर : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे घरात ठेवलेल्या गावठी पिस्तुलामुळे एका बारा वर्षाचा मुलाला प्राण गमवावे लागले आहे. आदित्य मोरे असे या मुलाचे नाव असून पिस्तूलसोबत खेळत असताना त्यातून गोळी सुटल्याने आदित्यचा मृत्यू झाला आहे.

आदित्य मोरे याचे चुलते नवनाथ मोरे याने घरात गावठी पिस्तूल आणून ठेवले होते. मंगळवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास आदित्य मोरे याला हे पिस्तूल मिळाले. त्या पिस्तूलमध्ये काडतुसे होते. पिस्तूलबरोबर खेळताना आदित्यकडून गोळी सुटून त्याच्या छातीत लागली. पिस्तूलाचा आवाज झाल्यानंतर घरातील व्यक्ती बाहेर आल्या आणि आदित्यला लागलीच  वांबोरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यानच आदित्यचा मृत्यू झाला. आदित्यची आई जया मोरेच्या फिर्यादीवरून नवनाथ नामदेव मोरे विरुध्द मृत्यूस कारणीभूत ठरणे, आर्म अॅक्टनुसार राहुरी पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. आरोपी नवनाथ मोरे याला राहुरी पोलिसांनी अटक केली असून पिस्तूलही जप्त केले आहे. नगर जिल्ह्यामध्ये गावठी पिस्तूल विक्री, त्यातून होणारे गुन्हे हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे.