जळगाव । भविष्यातील ही शेती पाण्याच्या काटेकोर वापरासह मातीच्याही संधारणेतून अधिक समृद्ध होईल. आजची स्थिती लक्षात घेता जलसंधारणे सोबतच मृदसंधारणेवरही अधिक भर द्यावा लागेल आणि याची सुरवात वनांच्या रक्षणातून करावी लागेल. जी गावे लोकसहभागातुन ‘माथा ते पायथा’ याप्रमाणे जलसंधारण आणि मृदसंधारणाची कामे करतील तीच गावे भविष्यात टिकतील असे प्रतिपादन जळगाव जिल्ह्याचे विभागीय उप वन संरक्षक डी. डब्ल्यु पगार यांनी केले. गांधी रिसर्च फाऊंडेशनने हाती घेतलेल्या ‘बा-बापू 150’ ग्रामविकास प्रकल्पांतर्गत ‘लोकसहभागातून पाणलोट विकास व जलसंधारण’ या विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
33 गावांतील नागरिकांचा सहभाग
जैन हिल्स येथील सुबीर बोस सभागृहात झालेल्या कार्यशाळेत जिल्हा कृषि उपसंचालक अनिल भोकरे, पाणलोट विकासाचे तज्ज्ञ प्रशिक्षक भटु रंगराव पाटील, ममुराबाद कृषि विज्ञान केंद्राचे वैभव सूर्यवंशी, जैन इरिगेशनचे कृषितज्ज्ञ व्ही. बी. पाटील, कांदा करार शेतीचे प्रमुख गौतम देसर्डा, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विनोद रापतवार उपस्थित होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला सुतीहार घालुन कार्यशाळेची सुरवात झाली. कार्यशाळेत जळगाव, एरंडोल, धरणगाव, पाचोरा या तालुक्यांमधील 33 गावांचे सरपंच, उपसरपंच, प्रतिनिधी, शेतकर्यांनी सहभाग घेतला. लोकसहभागातुन पाणलोट विकास यावर भटु पाटील यांनी मार्गदर्शन केले. बदलत्या काळातील शेती व उच्च कृषि तंत्रज्ञान यावर व्ही. बी. पाटील यांनी, मसाला पिकांची लागवड व उत्पादन याविषयी गौतम देसर्डा यांनी तर पाणलोट क्षेत्र संकल्पना यावर डॉ. वैभव सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. शेतकर्यांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ), सेंद्रीय शेती, उच्च कृषि तंत्रज्ञान, मृदसंधारण, नेतृत्व व संवाद कौशल्ये, लोकसहभागातुन ग्रामविकासाचा आराखडा या विषयांवर कार्यशाळेत विचारमंथन करण्यात आले.