रांची । देशासाठी हॉकी खेळले व पं.बंगाल राज्य संघाचे कर्णधार गोपाळ भेंगरा यांनी शारीरिक कारणांमुळे हॉकी खेळणे सोडले होते. त्यांना उदर निर्वाहासाठी दगड फोडून जिवन जगावे लागत होते.याची माहिती 2000 साली सुनिल गावस्कर यांना मिळाली होती.त्यापासून त्यांनी या हॉकीपटूला भेट न घेता मदत करित आले आहे.रविवारी माजी आंतरराष्ट्रीय हॉकीपटू गोपाल भेंगरा यांची कित्येक वर्षांपासूनची सुनील गावसकर यांना भेटण्याची इच्छा अखेर पूर्ण झाली.त्यावेळी दोन्ही जण अत्यंत भावूक झाले होते.
वातावरण भावूक झाले
रांची कसोटीत समालोचन करण्यासाठी सुनिल गावसकर आलेले आहेत.हे भेंगरा यांना माहिती झाले तेव्हा ते गावसकर यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी स्टेडियमवर पोहोचले. झारखंड राज्य क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष अजय नाथ शाहदेव यांनी भेंगरा यांना अतिथी बनवून गावसकर यांची भेट घालून दिली. जेएससीए स्टेडियममध्ये दोन्ही खेळाडू भेटले तेव्हा वातावरण भावनिक झाले होते. दोघांनी एकमेकांचे फक्त स्वागत केले नाही, तर एकमेकांशी दिलखुलास चर्चाही केली. भेंगरा या माजी खेळाडूला गावसकर गेल्या 16 वर्षांपासून आर्थिक मदत करत आहेत. भेंगरा यांनी 1978 मध्ये ब्युनस आयर्स येथे झालेल्या तिसर्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. गावसकर रांचीत आले आहेत, भेंगरा पहिल्यांदा गावसकर यांना भेटले. त्यांनी गावसकर यांना झारखंडची पारंपरिक शाल भेट दिली. गावसकर यांची भेटू घेऊन मी गहिवरलो आहे, असे त्यांनी म्हटले. हा क्षण गावसकर यांच्यासाठीसुद्धा भावनांनी ओलाचिंब करणारा ठरला.
पेन्शन मिळत नव्हती
झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील उचुर गावात राहणारे भेंगरा 1975 ते 1985 या काळात देशासाठी हॉकी खेळले. प. बंगालच्या राज्य संघाचे कर्णधार भेंगरा यांनी 1986 मध्ये शारीरिक कारणांमुळे हॉकी खेळणे सोडले आणि ते गावी परतले. सेनेत नोकरी करतानासुद्धा काही कारणामुळे भेंगरा यांना पेन्शन मिळाली नाही. भेंगरा दगड फोडून उदरनिर्वाह करत आहेत, हे गावसकर यांना 2000 मध्ये कळले. तेव्हापासून भेंगरा यांना मदत करण्याचे गावसकर यांनी ठरवले आणि तसे केलेसुद्धा.