बारामती । बारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. आचारसंहिताही लागू झाली आहे. सरपंचाच्या निवडीसाठी ग्रामस्थांनाही मतदान करता येणार असल्यामुळे अधिकच चुरस निर्माण झाली आहे. केंद्रसरकारकडून ग्रामपंचायतीला मिळणारा निधी ही थेट ग्रामपंचायतीकडे येणार असल्यामुळे या निवडणुकीत आणखी रंगत चढणार आहे. मुरूम, वाघळवाडी, लोणीभापकर, वाणेवाडी, कार्हाटी, मासाळवाडी, मोरगाव, पळशी, सोरटेवाडी, पणदरे, सोनकसवाडी, गडदरवाडी, कुरणेवाडी या गावांमध्ये निवडणूक जाहीर झाली आहे. यातील मोरगाव, पणदरे, लोणीभापकर ही गावे जास्त लोकसंख्येची असून तालुक्यातील महत्त्वाची गावे आहेत. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच तापण्याची लक्षणे आहेत.
सातवी पास बंधनकारक
पूर्वीप्रमाणेच निवडणूक चिन्ह म्हणून मुक्त चिन्हाचा वापर करण्यात येणार आहे. राजकीय पक्षांसाठी आरक्षित असलेल्या चिन्हांचा या निवडणुकीत वापर होणार नाही. सरपंच पदासाठी निवडणूक लढविणारा उमेदवार हा सातवी पास असणे ही महत्त्वाची अट आयोगाकडून घालण्यात आली आहे. या उमेदवारांना सातवी पास झाल्याचे प्रमाणपत्र किंवा सक्षम प्राधिकार्याने तसे प्रमाणित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
विकास कामांवर निर्बंध नाही
ज्या तालुक्यात 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असतील तर अशा तालुक्याच्या संपूर्ण ग्रामीण क्षेत्रात आचारसंहिता लागू आहे. बारामती तालुक्यात 144 ग्रामपंचायती असून यातील 13 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे संपूर्ण बारामती तालुक्यात आचारसंहिता लागू होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. निवडणूक होत नसलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकास कामावर कोणतेही निर्बंध नाहीत. सदरची आचारसंहिता ही 16 ऑक्टोबरनंतरच संपणार आहे.
मतदाराला द्यावी लागणार चार मते
सरपंचाच्या निवडीसाठी ग्रामस्थांना पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. एका मतदाराला कमीत कमी तीन व जास्तीत जास्त चार मते द्यावी लागणार आहेत. यातील एक मत थेट सरपंचाच्या निवडीसाठी असेल तर अन्य मते आपल्या प्रभागातील सदस्यांच्या निवडीसाठी द्यावी लागणार आहेत. सरपंचाच्या मतपत्रिकेचा रंग निळसर असेल तर सदस्यांसाठीच्या मतदान पत्रिकेचे रंग पूर्वीप्रमाणे लाल-पिवळे असतील. अनुसूचित जातीच्या मत पत्रिकेचा रंग फिका गुलाबी, अनुसुचित जमातीच्या राखीव जागेसाठीच्या मत पत्रिकेचा रंग फिका हिरवा तर नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या जागेसाठीच्या मतदान पत्रिकेचा रंग फिका पिवळा राहणार आहे. सर्वसाधारण जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग पांढरा राहणार आहे.