उरुळी कांचन । गावाचे सौंदर्य वाढविण्यासाठी येथे सर्वांगी विकासकामे होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व नागरिकांनी मतभेद विसरून सहकार्य करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सोरतापवाडीचे सरपंच सुदर्शन चौधरी यांनी केले.हवेली तालुक्यातील सोरतापवाडी येथील उपळवस्ती ते सोलापूर रस्त्याच्या (मेन रोड) ड्रेनेजलाइन कामाचे भूमीपूजन सरपंच सुदर्शन चौधरी आणि माजी सरपंच, तसेच ग्रामपंचायत सदस्य सागर चौधरी यांच्या हस्ते झाले. यावेळी सुदर्शन चौधरी बोलत होते. सोरतापवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून 16 लाख रुपये मंजूर झाले आहेत. साधारण 18 इंचाची पाइपलाईन टाकण्यात येणार असून 575 मीटर लांबीची असणार आहे. पहिल्या टप्प्यात उपळवस्ती ते सोरतापवाडी फाट्यापर्यंत ड्रेनज लाईन टाकण्यात येणार आहे, असे चौधरी यांनी पुढे सांगितले.
विकासकामांना सहकार्य करा
सोरतापवाडी या गावाला रूरल बन योजनेतून या कामासाठी 75 लाख रुपये मंजूर झाले असून, सोरतापवाडी फाटा ते वाकडा पुल (म्हसोबा-मंदिर) पर्यंत ड्रेनेज लाईन होणार आहे. इतर गावांपेक्षा आपल्या गावात मोठ्या प्रमाणात निधी आला आहे. त्यामुळे गावातील विकास कामे करण्यासाठी अनेक अडचणी येतात. मात्र मतभेद विसरून विकासकामांना सहकार्य करावे, असे माजी सरपंच सागर चौधरी यांनी सांगितले. यावेळी उपसरपंच स्वाती चोरघे, सुनीता कड, भारती चौधरी, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष आप्पासाहेब लोणकर, नानासाहेब चोरग, देवस्थानचे उपाध्यक्ष बापुसाहेब लाड, सुहास चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.