मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयासमोर रास्ता-रोको
मुंबई-शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारने श्री शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१८ ही कर्जमाफीची योजना सुरु केली. तसेच केंद्र व राज्य सरकारने शेतमालाला हमी भाव देण्याची घोषणा केली. परंतु प्रत्यक्षात अनेकांना कर्जमाफीचा लाभ मिळालाच नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोण थांबत नसल्याने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील कवठा गावच्या गावकऱ्यांनी आपले गावच गहाण ठेवण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतल्याची माहिती सेवाग्राम स्कूल ऑफ नेचर अँण्ड कल्चरचे विनायकराव पाटील यांनी दिली. घोषणा केल्याप्रमाणे शेतमालाला उत्पादन खर्चाच्या प्रमाणात अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक वंचनेतून दिलासा मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा
याबाबत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्यासंदर्भात २५ सप्टेंबर २०१८ रोजीपासून किल्लारी येथे देहत्याग करेपर्यंतचे आमरण उपोषण सुरु केले. त्यावर २९ सप्टेंबर २०१८ रोजी मुख्यमंत्री कार्यालयाकडून कृषी विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली १ ऑक्टोंबर रोजी यांच्यासोबत बैठक आयोजित करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन लातूरचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या माध्यमातून आश्वासन देत उपोषण मागे घेण्यास लावल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र दिलेल्या आश्वासनानुसार ऑक्टोंबर महिन्याची १० तारीख उजाडली तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अद्याप कोणतेही बैठक आय़ोजित करण्यात आली नाही. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव प्रविण सिंग परदेशी यांना प्रत्यक्ष भेटून विचारणा केली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वेळेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत उत्तर त्यांनी दिल्याचे पाटील यांनी सांगितले. आम्ही केलेल्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर १६ ऑक्टोंबर २०१८ रोजी मंत्रालयासमोर रास्ता-रोको आंदोलन करून गाव गहाण टाकण्याची प्रक्रियाही पूर्ण करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.