जळगाव । गितांजली केमिकल्स कंपनी स्फोटाप्रकरणी दाखल असलेल्या गुन्हात संशयितांनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनावर उद्या दि.9 रोजी कामकाज होणार आहे. गितांजली केमिकल्स् कंपनीत स्फोट होवून पाच जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सपोनि समाधान पाटील यांच्या फिर्यादीवरून फॅक्टरी मॅनेजर जितेंद्र पाटील, प्रॉडक्शन मॅनेजर दिलीप इंगळे, शिफ्ट मॅनेजर श्रीकांत काबरा यांच्यासह कंपनीचे संचालक सुरेंद्रकुमार मोहता, मधु सुरेंद्र मोहता व पवनकुमार देवरा यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सुरेंद्रकुमार मोहता, मधु सुरेंद्र मोहता व पवनकुमार देवरा यांनी न्या. ज्योती दरेकर यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज मिळावा यासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर तपासाधिकारी डीवायएसपी सचिन सांगळे यांनी खुलासा सादर केला होता. तसेच यापूर्वी अटक करण्यात आलेले फॅक्टरी मॅनेजर जितेंद्र पाटील, प्रॉडक्शन मॅनेजर दिलीप इंगळे, शिफ्ट मॅनेजर श्रीकांत काबरा यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. या दोन्ही अर्जांवर सरकारतर्फे अॅड.केतन ढाके यांनी न्या.दरेकर यांच्या न्यायालयात युक्तीवाद करीत जामीनावर हरकत घेतली आहे. दरम्यान संशयितांच्या अटकपुर्ववर व अटकेत असलेल्यांच्या जामीनावर 9 रोजी निर्णय होण्याची शक्यता आहे.