गिरगाव चौपाटीवरील कबुतरखाना जमीनदोस्त

0

मुंबई । गिरगाव चौपाटीवर बेकायदा बांधलेल्या कबुतरखान्यावर मुंबई महापालिकेने धडक कारवाई केली. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार पालिकेच्या कर्मचार्‍यांनी बुलडोझर फिरवून हा कबुतरखाना जमीनदोस्त केला. या कारवाईमुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. गिरगाव चौपाटीचा जागतिक वारसा यादीत समावेश असल्यामुळे चौपाटीवर कोणतेही बांधकाम करता येत नाही, असे असतानाही कोणतीही परवानगी न घेता भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी तेथे कबुतरखाना बांधला होता.

लोढांच्या हट्टापायी कबुतरखाना
लोढा यांनी याआधीही चौपाटीवर कबुतरखाना बांधला होता. त्यावेळी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी महापालिकेला तत्काळ कारवाई करण्यास सांगितले होते. त्यानंतर पालिकेने कबुतरखाना तोडला होता. मात्र, लोढा यांनी पुन्हा त्याच ठिकाणी कबुतरखाना बांधला. त्यावरही पालिकेने कारवाई केली आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार पालिकेने कबुतरखाना तोडला आहे. शिवसेना विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी या बेकायदा बांधकामाबाबत अनेकदा तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपमधील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.