यावल : तालुक्यातील गरगाव येथील अवैधपणे झालेली वृक्षतोड संदर्भात 13 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असलातरी अद्यापपर्यंत आरोपीला अटक करण्यात आलेली नाही शिवाय या गुन्ह्यात कलम वाढवून कारवाई करण्यासंदर्भात यावलचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाची प्रत पंतप्रधान कार्यालय, नवी दिल्ली तसेच मुख्यमंत्री व वन संरक्षक, वन प्रधान, नागपूर तसेच वनमंत्री व डीजीपी, मुंबई, नाशिक आय.जी., जळगाव एस.पी.आदींना पाठवण्यात आल्या आहेत.
ग्रामपंचायतीला मेल प्राप्त
गिरडगाव ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेल्या मेलनंतर त्यांना त्याबाबत रीप्लाय प्राप्त झाला असून तक्रारी पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आल्याचे त्यात नमूद आहे. दरम्यान, सद्दाम शहा खलील शहा व इतर दहा ते बारा जण यांच्याविरुद्ध तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी निवेदन देताना सरपंच अलका पाटील, सरपंच पती मधुकर पाटील, ग्रामसेवक भोजराज फालक, उपसरपंच आनंदा पाटील, पोलिस पाटील अशोक पाटील, ग्रामपंचायत सदस्य नितीन पाटील, भागवत पाटील, ग्रामपंचायत शिपाई भावडू पाटील व पांडू पाटील व गिरडगाव ग्रामस्थांनी केली आहे.