गिरणा धरणातून अंजनी प्रकल्पात आवर्तन सोडण्याची मागणी

0

एरंडोल । एरंडोलसह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी गिरणा धरणातून जामदा डाव्या कालव्याच्या माधमातून अंजनी प्रकल्पात आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी नगराध्यक्ष रमेश परदेशी व पदाधिकार्‍यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन याना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी भाजपाचे विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, उपनगराध्यक्ष जाहिरोद्दिन शेख कासम, बाजार समितीचे सभापती तथा माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन, माजी नगरसेवक डॉ.नरेंद्र पाटील, आनंद दाभाडे यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

अंजनीत पाणी नसल्याने भविष्यात पाणीटंचाई
यावर्षी अंजनी प्रकल्प परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे प्रकल्पातील जलसाठ्यात कोणतीही वाढ झालेली नाही. सद्यस्थितीत प्रकल्पात केवळ 4.28 टक्के जलसाठा असल्यामुळे आगामी काळात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. अंजनी प्रकल्पातून शहरासह कासोदा, तळई, फरकांडे, सावखेडा या गावांसह ग्रामीण भागात पाणीपुरवठा केला जातो. मात्र प्रकल्पातील असलेल्या जलसाठ्यामुळे या सर्व गावांना पुरेशा प्रमाणावर पाणी पुरवठा होऊ शकत नाही. यावर्षी गिरणा धरणात समाधानकारक जलसाठा असल्यामुळे गिरणा धरणातून आवर्तन सोडून अंजनी प्रकल्प भरल्यास भविष्यातील पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. सद्यस्थितीत शहरात चार दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. याबाबत सकारात्मक निर्णय घेवून गिरणा धरणातून आवर्तन सोडून अंजनी प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. दरम्यान यावर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी विहिरींच्या पाण्याच्या पातळीत कोणतीही वाढ झालेली नाही. अंजनी प्रकल्पातील असलेल्या जलसाठ्यातून पाण्याची उचल सुरु असल्यामुळे एक महिन्यानंतर पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची भिती आहे.

गिरणा धरणातून आवर्तन सोडून अंजनी प्रकल्पातील जलसाठा वाढविण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन याना निवेदन देण्यात आले आहे.जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून पाणी समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. नागरिकांनी देखील पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
-रमेश परदेशी, नगराध्यक्ष, एरंडोल