लिलाव न करताच वाळू विकण्याचा घाट
जळगाव– जळगाव तहसिल कार्यालयाने आज गिरणा नदीपात्रा लगतच्या नागझिरी, सावखेडा, निमखेडी ह्या गावातील अनधिकृत वाळूसाठे जप्त केले आहेत. या कारवाईत अनेक बाबतीत अनियमितता दडली आहे.याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
या कारवाई दरम्यान जप्त वाळू साठ्यांचे पंचनामे केलेले नाहीत. पंचनाने न केल्यामुळे किती ब्रास वाळू जप्त केली आहे व किती ब्रास वाळूची वाहतूक झालेली आहे. या मध्ये घोळ होऊन शासनाचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. जप्त केलेली वाळू ही जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयामध्ये असलेल्या मोकळ्या जागेत साठवली जात आहे. पण ह्याच जागेवर पूर्वी जप्त वाळूची साठवणूक केलेली होती व त्या वाळूचा लिलाव एका इन्फ्रास्ट्रक्चरच्या ठेकेदाराने घेतलेला होता. पण त्याने अजूनपर्यंत तेथील वाळूची वाहतूक केलेली नाही, आज जप्त झालेली वाळूही त्याच ठिकाणी (पूर्वीची वाळू जेथे होती) एकत्र करून टाकण्यात येत आहे. वाळू ठेकेदाराला ही वाळू फुकट मध्ये देण्याचा घाट घातला जात आहे याची चौकशी करण्यात यावी.
वरील तिन्ही ठिकाणी किमान अंदाजे पाच हजार ब्रास वाळू महसूल विभागाने जप्त केलेली असून त्यांनी सदरील वाळूचा पंचनामा व वाळूचे मोजमाप हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सक्षम अधिकाऱ्याकडून करणे आवश्यक असताना थातुरमातुर कारवाई केल्याचे चित्र आज होते. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे.