भोर । गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर सरकार झोपेचे सोंग घेत आहे. या सरकारला पुन्हा जागे करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी एक ऑगस्ट रोजी सर्व गिरणी कामगारांचा विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी कापूरव्होळ येथे दिली. गिरणी कामगारांची कृती समिती व राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने भोर, वेल्हे, मुळशी व पुरंदर परिसरातील गिरणी कामगारांची सभा आयोजित केली होती. त्यावेळी मोहिते बोलत होते. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, बजरंग जाधव, सचिव शिवाजी काळे, मच्छिंद्र काळे, संघटक सचिव रोहिदास चोरघे, साई निकम, भोर-वेल्हे तालुका संपर्क प्रमुख किसन भगत, लक्ष्मण ओंबळे, काका जगताप, लक्ष्मण दळवी, कैलास कोलते, दादा आंबवले, रविकांत भोसले आदी उपस्थित होते.
घरांचे वाटप रखडले
पावणेदोन लाख गिरणी कामगार असून त्यांना गिरणीच्या तसेच एमएमआरडीएच्या जागेवर मुंबईमध्ये घरे मिळणार आहेत. 2005 पासून घरे बांधण्याचे काम चालू असून आत्तापर्यंत फक्त 12 हजार कामगारांना घरे मिळाली आहेत. या वेगाने घरे मिळाली तर सर्व कामगारांना घरे मिळण्यासाठी 160 वर्षे लागतील. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 7 हजार 700 घरे तयार असल्याची घोषणा केली. परंतु दोन महिने उलटून गेले तरी घरांचे वाटप केलेले नाही. त्यामुळे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी दिवशी विधानभवनावर मोर्चाचे काढण्यात येणार आहे, अशी माहिती मोहिते यांनी दिली.
घरांसाठी कृती समितीचा लढा
ज्या गिरणी कामगारांनी घरांसाठी अजर्र् भरले नाहीत, त्यांना अजून संधी आहे. योग्य पुरावे जोडून त्यांनी अर्ज दाखल करावेत. सर्वांना घरे मिळण्यासाठी कृती समिती लढा देत आहे, असे शिर्सेकर यांनी सांगितले. भोर तालुक्यातील गिरणी कामगार दादा आंबवले यांनी मोर्चात भोर व वेल्हे तालुक्यातून जास्तीत जास्त गिरणी कामगार सहभागी होतील, अशी ग्वाही दिली. लक्ष्मण ओंबळे यांनी प्रास्ताविक तर किसन भगत यांनी आभार मानले.