पाचोरा। गिरणेच्या पाण्यावर नाशिक जिल्ह्यासह जळगाव जिल्ह्यातीलही अनेक गावे अवलंबुन आहे. दुर्देवाने मालेगाव शहरातुन वाहणार्या मोसम नदीत सध्या घाणीचा साम्राज्य वाढले असून त्यामुळे पाणी प्रदुषीत व दुर्गधीयुक्त झाले आहे. तसेच प्लॅस्टीक कचरा, कत्तल केलेल्या जनावरांचे रक्त मिश्रीत पाणी, जनावरांचे सांगाडे, शौचालयाचा मैला यामुळे पाणी प्रदुषीत झाले असून गिरणेच्या पाण्यावर तहान भागविणार्या गावांच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम करु पाहणारी दुषित पाणी रोखण्याची मागणी होत आहे.
जलसंपदामंत्री ना.महाजन यांची घेणार भेट
नाशिक जिल्ह्यातुन पाण्याचे आवर्तन सोडल्यास पाण्याचा निचरा जळगाव जिल्ह्यातुन वाहत असलेल्या गिरणेतुन होईल साहजिकच जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री असून जळगाव जिल्ह्याचे रहिवासी देखील असल्याने त्यांनी यावर उपाययोजना गरजेची असल्याचे बोलले जात आहे. सामाजिक कार्यकर्ते सुभाष परदेशी यांनी मानवनिर्मित संकटाला रोखण्याची मागणी नाशिक जिल्ह्यात लावून धरली असून जळगावात देखील ते प्रयत्न करणार आहे. पाचोरा-भडगाव तालुक्यातील सर्व राजकीय पक्ष, पर्यावरण प्रेमी संघटनांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून दुषीत पाण्यावर प्रतिबंध घालण्यात यावा अशी मागणी करण्यात येणार आहे. तसेच दुषीत पाण्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात येऊ नये यासाठी सुभाष परदेशी शिष्टमंडळासह मंत्री महाजन यांची भेट घेणार असून दुषीत पाणी रोखण्याची मागणी करणार आहे.