गिरीशभाऊ महाजन भविष्यातील मुख्यमंत्री!

0

जळगाव। जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातुन दरवर्षी 4 लाख रुग्णांवर उपचार करण्यात येऊन शस्त्रक्रीया केली जाते. त्यांनी महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून तळागाळातील जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिल्याने संपुर्ण राज्यात त्यांना आरोग्यदूत म्हणून ओळखले जाते. यामुळे गिरीशभाऊ हे भविष्यातील मुख्यमंत्री असल्याची भविष्यवाणी करून कॉग्रेसचे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी धमाल उडवून दिली. ते इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे आयोजित ‘अ‍ॅम्सकॉन-2017’च्या दोन दिवसीय परिषदेच्या पहिल्या दिवशी आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

‘आयएमए’ची परिषद
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र आणि आयएमए जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अ‍ॅम्सकॉन 2017’ या अ‍ॅॅकॅडमी ऑफ मेडिकल स्पेशालिटी यांच्या दोन दिवशीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन शहरातील हॉटेल कमल पॅराडाईस येथे करण्यात आले आहे. पहिल्या दिवशीय परिषदेच्या समारोप प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाजन उपस्थित होते. याप्रसंगी हे हास्यमय नाट्य रंगले. या परिषदेस माजीमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना देखील आमंत्रीत करण्यात आले होते मात्र ते उपस्थित राहू शकले नाही. खडसे, महाजन हे प्रतिस्पर्धी मानले जात असल्याने दोन्ही एका व्यासपीठावर येतील का? याबाबत साशंकता होती. अखेर खडसे उपस्थित राहिले नाही.

हास्याचे फवारे !
डॉ. उल्हास पाटील हे आपल्या नर्मविनोदी शैलीतील भाषणासाठी ख्यात आहेत. त्यांनी ‘आयएम’च्या व्यासपीठावरूनदेखील जोरदार राजकीय फटकेबाजी केली. यात त्यांनी थेट जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री ना. गिरीश महाजन हे मुख्यमंत्री बनणार असल्याचे भाकीत केल्याने उपस्थितांमध्ये हास्याची लकेर पसरली. गिरीशभाऊ आपल्या जिल्ह्याचे असून त्यांना भविष्यात मुख्यमंत्रीपद मिळावे अशी आमची प्रामाणिक इच्छा असल्याचे डॉ.पाटील यांनी सांगितले. राधेश्याम चौधरी यांनी देखील ना. गिरीश महाजन यांच्याबाबत गौरवोदगार काढले. यावर ना. महाजन यांनी तुम्ही कॉग्रेसवाले आमच्यात भांडण लावल्याशिवाय राहणार नाही अशा मिस्कील शब्दात उत्तर दिले.