भाजपमध्ये कुठल्या जिल्ह्यात गटबाजी नाही? प्रदेशाध्यक्ष दानवेंना पत्र लिहून सवाल
मुंबई : धुळे महानगरपालिकेची लवकरच निवडणूक होणार असून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर धुळे महानगरपालिकेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याबाबत धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना खरमरीत पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या कालच्या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी दिलेली जबाबदारी पूर्ण करावी असे निर्देश प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी दिले आहेत.या बैठकीला एक दिवस ही होत नाही तोवर धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी पक्षाच्या निर्णयाविरोधात सूर लावला आहे. दरम्यान येत्या २ ऑक्टोबरला धुळ्यात कार्यकर्त्यांची बैठक घेणार असून त्यांनतर पुढील निर्णय घेणार असल्याचे आमदार गोटे यांनी सांगितले आहे.
गोटे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, प्रदेश भाजपातर्फे गिरीष महाजन यांची धुळे महापालिका निवडणुकीच्या प्रभारी पदी नियुक्ती केल्याचे पत्र व्हाट्स अॅपवर वाचावयास मिळाले. आपल्या निर्णयाचे मनःपूर्वक स्वागत! प्रश्न असा आहे की, महाराष्ट्रात यापूर्वी झालेल्या किती पालिका निवडणुकींमधे प्रदेश समितीने बाहेरच्या जिल्ह्यातील प्रभारी नियुक्त करुन पाठविले?” असा सवाल गोटे यांनी दानवे यांना केला आहे. धुळे जिल्ह्यातील भाजपामधे गटबाजी आहे यासाठी प्रभारी नेमले हे आपले म्हणणे मान्य आहे. राज्यातल्या कुठला जिल्हा गटबाजी मुक्त आहे? हेही कळाले तर बरे होईल अशी कोपरखळी ही त्यांनी यावेळी लिहलेल्या पत्रात मारली आहे .
या पत्रात भाजपच्या सद्यस्थितीवर देखील गोटे यांनी भाष्य केले आहे. गोटे पुढे म्हणतात की, एक निश्चित की, बदल्यांमधे दलाल्या करणारे, नामचीन गुंडांच्या टोळी प्रमुखांच्या घरी येरझार्या घालून तुम्ही आमच्या पक्षात या म्हणून लाल गालीचा घालणारे, ज्यांना दिनदयालजी यांच्याबद्दल काहीही माहित नाही. तसेच संघाच्या नेत्यांची विचारवंतांची नावे देखील कानावरुन न गेलेल्यांची चलती सध्या पक्षात आहे असा गंभीर आरोपही गोटे यांनी या पत्रात केला आहे. आपण प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्त्यांना टाळून, गुन्हेगारी व पक्ष बदलण्याची पार्श्वभूमी असणार्याना घेवून भाजपाचा झेंडा फडकवू शकाल! मला तर, निष्ठावान, कष्टाळू, कार्यकर्त्यांबरोबरच रहावे लागेल असेही त्यांनी दानवे यांना सांगितले आहे.