मुंबई: सांगली येथे पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेले जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे बिनधास्तपणे हसत असल्याचे आणि सेल्फीसाठी पोझ देत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयात व्हायरल होतो आहे. यावरून गिरीश महाजन यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मंत्री महाजन यांच्यावर अतिशय तिखट शब्दात टीका केली आहे. मंत्री महाजन यांच्यावर टीका करताना त्यांनी सरकारमधील मंत्र्यांना माज आला असल्याचे सांगितले. “कोल्हापूर-सांगली परिसरात मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पाहणी करतात, खाली उतरत नाहीत. गिरीश महाजन सेल्फी काढत आहेत. यांना कसलाही फरक पडत नाही. कारण यांना ठाऊक आहे मतदान यांनाच होणार”, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. मुंबईत मनसेच्या पक्षमेळाव्यात ते बोलत होते.
‘भाजपामधील एक वरिष्ठ व्यक्ती पाच सहा जणांशी बोलत होती. उद्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष हे एकत्र जरी आले तरी आम्हीच जिंकणार. कारण त्यांच्याकडे मशीन्स नाही आहेत. कोण बोलले, कधी बोललं हे बाळा नांदगावकर यांना माहिती आहे असा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी केला.