श्रीनगर । सुरक्षा दलांच्या गोळीबारात युवक ठार झाल्याच्या निषेधार्थ काश्मीरमध्ये रविवारी बंद पाळण्यात आला. दुसरीकडे हुर्रियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष सय्यद अली शहा गिलानी आणि मिरवैझ उमर फारुक यांना नजरकैदेत ठेवण्यात आले असून, त्यांच्या नजरकैदेत वाढ करण्यात आली आहे.
काश्मीर खोर्यातील निवडणुकीत कोणताही अडथळा आणू नये म्हणून बहुतांश फुटीरतावादी नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. गिलानी यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले असून, त्यांना शुक्रवारच्या प्रार्थनेसाठीही जाऊ देण्यात येत नाही, अशी माहिती हुर्रियतचे प्रवक्ते अमलगम अय्याज अझगर यांनी दिली. मात्र, अमलगम यांच्यासह महंमद अशरफ सेहरयी, शब्बीर अहमद शाह, नयीम अहमद खान, पीर सैफुल्लाह आदी नेत्यांची मुक्तता करण्यात आली आहे.
हैदरपोरा भागातील गिलानी यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल आणि राज्य पोलिसांची फौज तैनात करण्यात आली आहे. हुरियतचे अध्यक्ष मिरवैझ उमर फारूक यांनाही नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. मिरवैझ यांच्या घराबाहेरही मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल आणि राज्य पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. श्रीनगर आणि अनंतनाग येथील लोकसभेच्या निवडणुकीवर बहिष्काराचे आवाहन केल्यानंतर या फुटीरतावादी नेत्यांच्या नजरकैदेत वाढ करण्यात आली आहे.