गीतरामायणात समरस झाले रसिक

0

पुणे : ‘स्वये श्री राम प्रभु ऐकती… दशरथा घे हे पायसदान… राम जन्मला गं सखी… ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा…’ अशा ग. दि. माडगूळकर यांनी रचलेल्या गीतरामायणातील अजरामर गीतांनी संपूर्ण रामायण प्रत्यक्ष समोर घडत असल्याचा अनुभव रसिकांनी घेतला. ग. दि. माडगूळकर आणि संगीतकार सुधीर फडके यांच्या आठवणी व गीतरामायणातील प्रत्येक गीत कशाप्रकारे तयार झाले, याची प्रक्रिया गायक श्रीधर फडके यांनी रसिकांना उलगडून दाखविली. फडके यांनी आपल्या कसदार गायकीने प्रत्येक गीतामधून रामायणातील प्रसंगांचे सचित्र वर्णन रसिकांसमोर उभे केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ तर्फे ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त गणेश कला क्रीडा मंच येथे सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला. यामध्ये ‘गीतरामायण’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

ग. दि. माडगूळकर यांनी गीतरामायणातील रचना कशा तयार केल्या, बाबुजींनी या गाण्यांना कशाप्रकारे चाली लावल्या, गीतांमधील शब्दमांडणी कशाप्रकारे केली, गीतरामायणातील गीत गाताना शब्दोच्चार कशाप्रकारे केला, अशा अनेक आठवणी आणि त्या काळातील अनुभव फडके यांनी कार्यक्रमादरम्यान सांगितले. ‘रामा चरण तुझे लागले, आज मी शापमुक्त जाहले…’ या गीताने रसिक भावूक झाले. ‘स्वयंवर झाले सीतेचे… जय गंगे जय भागिरथी…’ या गीतांमध्ये रसिकांनी सहभाग घेत ठेका धरला.

‘माता न तू वैरिणी…’ या गीतातून भरताचा झालेला संताप श्रीधर फडके यांच्या तडफदार गायकीने रसिकांच्या मनाला भिडला. माणसाच्या आयुष्याचे सार सांगणारे ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा…’ या गीताने रसिक अंतर्मुख झाले. ‘सेतू बांधा रे…’ या गीतातून रसिकांनीही ‘सीयावर रामचंद्र की जय’ असा जयघोष केला. ‘प्रभू मज एकच वर द्यावा… मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे…’ या गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. ‘रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळांनो श्री रामायण…’ या गीताने गीतरामायणातील कथा कशाप्रकारे न संपणारी आहे, याची अनुभुती रसिकांनी घेतली. तुषार आग्रे (तबला), अतुल माळी (की-बोर्ड), आदित्य आपटे (तालवाद्ये) यांनी साथसंगत केली. सुकन्या जोशी यांनी निवेदन केले.