गीतांजली एक्सप्रेसचा अपघात टळला

0

भुसावळ। मुंबईकडे जाणार्‍या गीतांजली एक्सप्रेस (अप-12860) च्या व्हील बेअरींगमध्ये खराबी होऊन धूर निघत असल्याचे निदर्शनास आल्याने गाडीचा संभाव्य अपघात टळला. नादुरुस्त कोच बदलविण्यात आला. याठिकाणी नविन कोच बसवून प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली यामुळे हि गाडी सव्वा दोन तास उशिराने भुसावळहून सुटली. प्रवाशांनी देखील डब्या खालून निघणारा धूर पाहून प्रवाशांनी सुचित केले.

कर्मचार्‍यांना दिसला धुर
रेल्वे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हावड्याहून मुंबईकडे अप दिशेला जाणारी गितांजली एक्सप्रेस ही 1.35 वाजेच्या दरम्यान भुसावळ स्थानकावर आली असता यातील शयनयान डबा क्रमांक एस 8 (इको 978255)च्या व्हील बेअरिंगमधून धूर निघत असल्याचे भुसावळ स्थानकात सवारी व मालडबा विभागाच्या कर्मचार्‍यांद्वारा गाडीची चलतपासणी निरीक्षणादरम्यान दिसून आले. यानंतर लागलीच यांत्रिक (मॅकेनिकल) विभागाचे पथकाने त्या डब्याची तपासणी करुन कोच बदलविण्याचे सांगितले. रेल्वे प्रशासनाने त्वरीत नादुरुस्त डबा बदलवून त्या ऐवजी दुसरा डबा (कोच क्रमांक डब्ल्यूआर.982291) जोडण्यात आला. या सर्व घडामोडीत गाडीचा तब्बल सव्वा दोन तास खोळंबा झाल्यानंतर गाडी दुपारी 3.43 वाजता मुंबईकडे मार्गस्थ झाली. मात्र गाडीच्या त्या डब्याची सस्पेंशन स्प्रींग तुटल्याची चर्चा स्थानक परिसरात सुरु होती. परंतु रेल्वे सुत्रांनी मात्र यावर नकार देऊन केवळ हॉट एक्सेल झाल्याचे सांगितले. गीतांजली एक्सप्रेसच्या व्हील बेअरींगमध्ये खराबी होऊन धूर निघत असल्याचे वेळीस निदर्शनास आल्याने गाडीचा संभाव्य अपघात टळला अशी चर्चा प्रवाशांमध्ये होती.