[व्हिडीओ] गीतांजली एक्स्प्रेसच्या जनरेटर बोगीला आग

0

शिरसोली स्थानकावर गाडी थांबवली ; प्रवाशांमध्ये खळबळ

जळगाव/भुसावळ- डाऊन 12859 गीतांजली एक्स्प्रेसच्या जनरेटर बोगीला आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी 12.20 वाजेच्या सुमारास घडली. शिरसोली स्थानक येत असताना गार्ड व प्रवाशांच्या लक्षात ही घटना येताच चैन पुलिंग करून या स्थानकावर गाडी थांबवण्यात आली तर रेल्वे प्रवाशांना आगीची माहिती मिळताच मोठी खळबळ उडाली तर अनेकांनी आगग्रस्त डब्याला लागलेली आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. याप्रसंगी प्रवाशांची मोठी जमा झाली होती. या घटनेची रेल्वे प्रशासनाला माहिती कळताच अधिकारी, कर्मचार्‍यांसह अग्निशमन दलाचा बंब रवाना करण्यात आला. या घटनेनंतर दुर्घटनाग्रस्त जनरेटर असलेल्या बोगीला (पॉवर कार) वेगळे करण्यात आले असून 23 डबे घेवून गीतांजली एक्स्प्रेस 12.50 वाजता जळगाव स्थानकाकडे रवाना झाल्याचे रेल्वेच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले.

आगीचे कारण गुलदस्त्यात
24 डब्यांच्या गीतांजली एक्स्प्रेसची अखेरची बोगी जनरेटरची (पॉवर कार) असून या बोगीलाच अचानक आग लागल्याचे सांगण्यात आले तर आगीचे नेमके कारण कळू शकले नसलेतरी अति उष्णतेमुळे आग लागल्याचा अंदाज आहे. शिरसोली स्थानकाजवळ ही घटना लक्षात आल्याने शिरसोली स्थानकावर गाडी थांबवण्यात आली. रेल्वेच्या अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी धाव घेतल्यानंतर आगग्रस्त डबा गाडीपासून वेगळा करण्यात आला. या प्रकारामुळे मात्र डाऊन गोवा एक्स्प्रेसला काही अंतरावर थांबवून ठेवण्यात आले तर अप गोरखपूर-एलटीटी काशी एक्स्प्रेस सुमारे एक तासांपासून जळगाव रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.