नवी दिल्ली : हरयाणामध्ये मागीलवर्षी आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवामुळे राज्य सरकार अडचणीत आले आहे. या उत्सवात व्हीव्हीआयपी पाहुण्यांना गीता भेट देण्यासाठी 10 प्रतींसाठी राज्य सरकासरने तब्बल 3.8 लाख रूपये मोजले आहेत. माहिती अधिकारांतर्गत हा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. गीताच्या प्रत्येक प्रतीची किंमत ही 38 हजार रूपये होती. एवढी महागडी गीता खरेदी करण्यावरून आता विरोधी पक्ष इंडियन नॅशनल लोकदलाने (आयएनएलडी) भाजप सरकारवर टीकेची झोड उठवण्यास सुरूवात केली आहे.
हेमामालिनींचेही नाव
श्रीमद् भागवत गीता ऑनलाइन आणि गीता प्रेसमधून खूप कमी किंमतीला मिळते. मग इतकी महागडी गीता खरेदी का केली याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या सरकारने द्यावे अशी मागणी आयएनएलडीचे नेते आणि हिस्सारचे खासदार दुष्यंत चौटाला यांनी केली. या कार्यक्रमासाठी भाजपच्या दोन खासदारांनाही पैसे देण्यात आले होते. खासदार हेमामालिनी 20 लाख तर दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांना 10 लाख रूपये देण्यात आले होते, असेही माहिती अधिकारांतर्गत समोर आले होते.