सांगली । कुख्यात गुंड इम्रान मुल्ला याच्या खूनप्रकरणातील मुख्य आरोपी फिरोजखान जमालखान पठाण (वय ३५, रा.मगरमच्छ कॉलनी, गवळी गल्ली) याचा भरदिवसा त्याच्या दुकानातच तलवारीने डोक्यावर, हातावर, पाठीवर, मांडीवर आणि पायावर सपासप वार करुन अत्यंत निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना काल घडली. याप्रकरणी चौघांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
भरदिवसा घडलेल्या घटनेने शिंदेमळा परिसरात खळबळ उडाली आहे. खून झाल्याची बातमी सर्वत्र अवघ्या काही वेळातच पसरली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. मयत फिरोजखान जमालखान पठाण याचे शिंदेमळा परिसरात हार्डवेअर, सेंट्रिंग साहित्य व पीओपीच्या साहित्याचे दुकान आहे. त्याने नेहमीप्रमाणे सकाळी दुकान उघडले होते. गिऱ्हाईकाला माल द्यावयाचा असल्याने तो नेहमीपेक्षा काहीवेळ लवकरच आला होता. त्याचे वडील काहीतरी साहित्य आणण्यासाठी गणपती पेठेत गेले होते. दुकानात तो एकटाच होता. हल्लेखोरांनी नेमकी हिच संधी साधून त्याच्या दुकानात घुसून तो खुर्चीवर बसला असतानाच त्याच्यावर तलवारीने सपासप वार केले. त्याच्या डोक्यावर पाच वार झाले आहेत.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे फिरोजखानला प्रतिकाराची संधीच मिळाली नाही. हल्लेखोरांनी त्याला दुकानातून बाहेर ओढून आणत पुन्हा मारले. दुकानात काउंटरवर तसेच दुकानाच्या बाहेरील भिंतीवर आणि शेजारच्या दुकानाच्या शटरवर रक्ताचे शिंतोडे उडाले होते. डोक्यावर जोरदार वार झाल्याने त्याची कवटी फुटून मेंदूचे अवशेष बाहेर पडले होते. घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले होते. फिरोजखानचा नातलग शाहीद पठाण हा काही कामानिमित्त तेथून चालला होता.