पुणे । गुंतवणुकदारांनी एकदा माझ्यावर विश्वास ठेवावा, असे कळकळीचे आवाहन सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी केले आहे.
शून्यातून विश्व उभे करणारे अशी डीएसके यांची ख्याती आहे. घराला घरपण देणारी माणस, अशी भावनिक जाहिरात डीएसके उद्योग समुहाने केली. त्याला मध्यमवर्गीयांनी साद दिली. एका मागोमाग एक डीएसके यांचे प्रकल्प यशस्वी होत गेले. बांधकाम, दुबईत हॉटेल, टोयोटाची शोरूम अशा विविध क्षेत्रात डीएसके यांचा संचार झाला. यशाच्या शिखरावर असताना डीएसके तरुणांचे प्रेरणास्थान बनले. त्यांच्या व्याख्यानाला गर्दी होऊ लागली. त्यांच्या प्रगतीचा आलेख मांडणार्या सीडी प्रचंड खपल्या. अनेक मध्यमवर्गीयांनी मोठ्या विश्वासाने डीएसके समुहात गुंतवणूक केली.
प्रारंभी गुंतवणूकदारांना परतावा चांगला मिळाला. डीएसके यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला. परंतु गेल्या काही महिन्यांपासून या समूहाला दृष्ट लागली. ड्रीम सिटी प्रकल्पामुळे उद्योग समूह अडचणीत सापडल्याचे बोलले जाऊ लागले. गुंतवणूकदारांनी डीएसके समुहाच्या कार्यालयात पैसे परत मिळावेत, याकरीता हेलपाटे मारण्यास सुरुवात केली. त्यातच डीएसके यांच्या गाडीला अपघात झाला. दैव बलवत्तर होते म्हणून ते बचावले. हा समूह बुडाला असेच वातावरण तयार झाले. आपल्याच कर्मचारी वर्गावर डीएसके संतापले अशी दृश्ये सोशल मिडीयावर फिरू लागली.
अतिसामान्य परिस्थितीतून वर आलेल्या या मराठी माणसाविषयी सहानुभूती तयार झाली. अनेक दिवस मौन पाळून असलेल्या डीएसके यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आणि एकदा विश्वास ठेवा, असे सांगितले. मी काही पळून जाणारा नाही, असेही ते म्हणाले. या आवाहनानंतर प्रतिक्रिया काय उमटतात, गुंतवणूकदार विश्वास व्यक्त करतील का? हे नजीकच्या दिवसात दिसेल.