गुंतवणूकदारांची ६३ लाखांची फसवणूक

0

पुणे । सुलभ हप्त्याने जमीन देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणात १७ गुंंतवणूकदारांची ६३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणात गुंतवणूकदारांची संख्या मोठी असण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चैत्राल शिंदीकर (३१,रा.कोंढवा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एम.जी.प्रॉपर्टीचे मालक मोहन गायकवाड (हरेकृष्णा पार्क, धानोरी) कर्मचारी अभय भामे, विकास मोरे व एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा सर्व प्रकार डिसेंबर २०१४ ते ऑगस्ट २०१७ दरम्यान घडला. गायकवाड यांनी कर्मचार्‍यांसोबत संगनमत करून फिर्यादी व इतर सोळा व्यक्तींची फसवणूक केली. स्वस्त दरात सुलभ हप्त्याने जमीन उपलब्ध करून देतो असे आमिष गुंतवणूकदारांना दाखवले होते. तसेच जमीन भाडेतत्त्वावर घेऊन दरमहा त्याचे भाडे देण्यात येईल असे आश्‍वासनही दिले होते. यासाठी फिर्यादी यांच्याकडून एक लाख रुपये तर इतर १६ जणांकडून ५३ लाख ४० हजार रुपये असे सर्व मिळून ६३ लाख ४० हजार रुपये रोख व इतर मार्गाने स्वीकारले होते.