भारतीय अर्थव्यवस्था कमालीची अस्थिर बनत चालली आहे. देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यापासून तर शेअर मार्केट सातत्याने ढासळताना दिसत आहे. मंगळवारी तर त्याने चांगलाच हिसका गुंतवणूकदारांना दाखवला. निर्देशांक कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे काही मिनिटांतच 5 लाख कोटी रुपये बुडाले आहेत, असा अंदाज आहे. आजपर्यंत एकाच दिवशी झालेली ही सर्वाधिक पडझड मानली जाते. भारताबरोबरच जगभरातल्या मोठ्या देशांचे बाजार कोसळले. हे अत्यंत निराशाजनक चित्र आहे.
मंगळवारचा दिवस गुंतवणूकदारांना धक्का देणारा ठरला. मंगळवारचा दिवस उजाडताच भारतीय शेअर बाजार कोसळला, अशा बातम्या झळकल्या. त्याबरोबर जपानचा निक्केई हा निर्देशांक 4.6 टक्क्यांनी कोसळला. ऑस्ट्रेलियाचे शेअर तीन टक्क्यांनी घसरले तर दक्षिण कोरियाच्या शेअर बाजाराने दोन टक्क्यांनी आपटी खाल्ली. गेल्या 100 दिवसांमधल्या सरासरीखाली या तीनही शेअर बाजारांनी पातळी गाठली आहे. भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स व निफ्टी अनुक्रमे 1200 व 400 अंकांनी घसरले आहेत. तसा हा किचकट विषय आहे. मार्केटमध्ये पैसे गुंतवणार्यांचा हा खेळ मानला जातो. परंतु, त्यामध्ये लाखोंच्या संख्येत सामान्य गुंतवणूकदारही आहेत. मध्यमवर्गीय आणि सामान्य गुंतवणूकदारांचे जणू कंबरडे मोडण्याचा प्रकार आज घडला आहे. नुकत्याच पार पडलेल्या बजेटमध्ये शेअर्सवरील दीर्घकालीन नफ्यावरही कर लावण्यात आला आहे. याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम बाजारावर झाला असून, सलग सहा दिवस झाले बाजार घसरत राहिला व शेवटचा घाव जागतिक बाजारातल्या पडझडीनेे मंगळवारी घातला. या दीर्घकालीन नफ्यावरील कराबाबत काय करता येईल, याचा विचार सरकार आता करेल, असे तज्ज्ञ म्हणत आहेत. मुंबई शेअर बाजारातील 2,221 शेअर्सचे भाव गडगडले, तर 169 शेअर्स वधारले व 83 कंपन्यांचे शेअर्स अबाधित राहिले. शेअर बाजार उघडण्यापूर्वी मंगळवारी सेन्सेक्समध्ये मोठी पडझड झाली होती. मात्र, दिवस संपता-संपता सेन्सेक्सही काहीसा सावरला. सकाळी 1200 अंकांनी झालेली घसरण दिवसअखेर 561 अंकांवर, तर निफ्टीची घसरण 168 अंकांवर थांबली. सध्या सेन्सेक्स 34 हजार 195 आणि निफ्टी 10 हजार 498 अंकांवर आहे. सकाळी सेन्सेक्स तब्बल 1200 अंकांनी गडगडला, तर निफ्टीमध्येही 371 अंकांपेक्षा अधिक घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्समध्ये झालेली घसरण ही 2015 नंतरची सर्वात मोठी घसरण आहे. गुंतवणूकदारांचे पाच लाख कोटी रुपये बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अमेरिकन बाजारपेठेत झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. अमेरिकेची अवस्था नाजूक असताना फेडरल बँकेने व्याजदर शून्य टक्क्यांवर आणले होते. मात्र, आता अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागल्यामुळे व्याजदर 1 टक्का करण्यात आले, पण ते आणखी दोन टक्क्यांनी वाढून 3 टक्क्यांपर्यंत व्याजदर जाऊ शकतात. त्यामुळे आज अमेरिकन बाजाराने आपटी खाल्ली. परिणामी, विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसा काढून घेतला. अर्थसंकल्पात दीर्घ गुंतवणुकीवर मिळणार्या परताव्यावर भरभक्कम व्याज लावण्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे. त्याचाही परिणाम बाजारात दिसून येत आहे. अन्य देशांमधील निर्देशांक कोसळल्यामुळे भारतीय शेअर बाजार कोसळला आहे. अमेरिकी शेअर बाजाराने ऐतिहासिक म्हणता येईल अशी पडझड बघितली. वाढत्या व्याजदारांमुळे घाबरून जाऊन शेअर्सची विक्री करण्यात आली डाऊ निर्देशांक 4.6 टक्क्यांनी घसरला. इंग्लंडमधला शेअर बाजारही कोसळला तसेच जपान व अन्य आशियाई देशांनीही शेअर्सचे घसरते भाव अनुभवले. याचा थेट परिणाम भारतीय बाजारात दिसून आल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. अमेरिकी फेडरल रिझर्व्हची सक्ती, महागाईची भीती आणि बॉन्ड उत्पन्न आदींमुळे हा परिणाम झाला, असे बीएनपी परिबास म्युच्युअल फंडाचे अधिकारी रितेश जैन यांनी सांगितले. जगातील बहुतांश अर्थव्यवस्था गुंतवणुकीसाठी आणि कर्जासाठी डॉलरवर अवलंबून आहेत. त्यामुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेतील बदलांचा फटका सर्वांनाच बसतो. वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे या अर्थव्यवस्थांवरही परिणाम होऊ शकतो. अमेरिकी अर्थव्यवस्था विकासाच्या दिशेने जाऊ लागल्यास विकसनशील देशांकडून अमेरिकेत होणार्या आयातीच्या प्रमाणात वाढ होईल. त्यामुळे या देशांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असाही एक अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यातच अमेरिकेतील रोजगाराची स्थिती दर्शवणारी अधिकृत आकडेवारी शुक्रवारी जाहीर झाली. या दोन्हींचा एकत्रित परिणाम स्टॉक मार्केटवर झाला आहे. दुसर्या बाजूला आता भारत सरकारने बिटकॉइन करन्सीवर टाच आणण्याचे धोरण स्विकारले आहे. बिटकॉइन एक डिजिटल करन्सी आहे. या करन्सीचा वापर डिजिटल वॉलेटमधूनच होऊ शकतो. 2009 मध्ये एका अज्ञात व्यक्तीने याची निर्मिती एलियस सतोशी नाकामोटी नावाने केली होती. बँकांशिवाय देव-घेव करण्याची पद्धत या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे.
भारतामध्ये या करन्सीला कायदेशीर मान्यता नाही. मात्र, आंतराराष्ट्रीय बाजारपेठेत याची उलाढाल आहे. अगदी अडरवर्ल्डनेही या करन्सीचा वापर केला आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमनेही तशी कबुली दिली होती. व्हर्च्युअल करन्सी बिटकॉइनने कमाई करणार्यांना आता टॅक्स द्यावा लागणार आहे. सीबीडीटीचे प्रमुख सुशील चंद्रा यांनी मंगळवारी सांगितले, की बिटकॉइनने कमाई करत असल्यास त्यावर टॅक्स दिला नाही, तर कारवाईला सामोरे जावे लागेल. त्याशिवाय यातून कमाई करणार्यांना त्यांच्या उत्पन्नाचे स्रोतही सांगावे लागेल. सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बिटकॉइन करन्सी लीगल नसल्याचे म्हटले आहे. अरुण जेटलींनी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला. जेटलींच्या अर्थसंकल्पीय भाषणात क्रिप्टोकरन्सीचा उल्लेख होता. जेटली म्हणाले होते, ‘सरकार क्रिप्टोकरन्सी व कॉइनला कायदेशीर मानत नाही. ही करन्सी नष्ट करण्यासाठी पावले उचलली जातील. बेकायदेशीर कृत्यांमध्ये क्रिप्टो करन्सीद्वारे होणारे फायनान्स संपुष्टात आणले जाईल, त्यासाठी सरकार पावले उचलत आहे.’ अर्थसंकल्पाआधी बिटकॉइनचे दर 11,685 यूएस डॉलर्स अर्थात भारतीय चलनानुसार 7,49,446 रुपये होतात. मात्र, अर्थसंकल्पानंतर दोन दिवसांनी त्याचे रेट 8574 यूएस डॉलर्स एवढे झाले. भारतीय चलनानुसार त्याची किंमत 5,49,914 रुपये आहे. यादरम्यान, या करन्सीचे दर 27 टक्क्यांनी खाली आले आहेत. गुंतवणूकदारांसाठी यालाच म्हणतात दुष्काळात तेरावा महिना.