नवी दिल्ली: लोकशाहीत प्रत्येकाला मतदानाचा हक्क आहे. मतदान करणे हा राष्ट्रीय कर्तव्यच आहे. कारण आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपले प्रतिनिधित्व करत असतात. त्यामुळे योग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. त्यासाठी जनजागृती देखील केली जाते. दरम्यान आज २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. गुगलने मतदारांना मतदान करण्याबाबत आवाहन केले आहे. गुगलने आज खास डुडल तयार केले आहे. त्याद्वारे मतदान करण्याचे आवाहन केले आहे. गुगलने खास डुडल तयार केले असून यामध्ये बोटावर शाई लावल्याचे चित्र रेखाटण्यात आले आहे.
निवडणुका जाहीर झाल्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सरकारी आणि खासगी संस्थांकडून जनतेला विविध प्रकारे मतदानासाठी प्रेरित केले जात आहे. जाहिराती, स्ट्रीट प्ले, सेलिब्रिटींकडून आवाहन या मार्गे जनजागृती केली जाते. त्यातच सतत ऑनलाईन असणाऱ्या अबाल-वृद्धांवर गुगलचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे आता गुगलनेही मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गुगल इंडियाने नेहमीच विशेष प्रसंगानुरुप डुडल साकारले आहेत. त्यात आजच्या दिवसाचीही भर पडली असून देशातील लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचा असणारा आजचा मतदानाचा दिवस लक्षात घेता गुगलकडून अशा प्रकारे मतदानाचे आवाहन करण्यात आले आहे.