नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने टी-२० आणि वन डे टीमचे कर्णधारपद सोडले आहे. या घोषणेनंतर गुगलवरील टॉप सर्चमध्ये Why did Dhoni resign हे वाक्य ट्रेंड होताना दिसत आहे. या माध्यमातून अनेकजण आपापल्यापरीने धोनीच्या निर्णयामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. धोनी यापुढेही क्रिकेट खेळत राहील असेही बीसीसीआयने म्हटले आहे. इंग्लंड विरूद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत धोनी खेळणार आहे. मात्र त्याने हा निर्णय का घेतला हे जाणून घेण्याचीच अधिक उत्सुकता नेटकरी मंडळींना लागून राहिली आहे. बीसीसीआयने पत्रक प्रसिद्ध करून धोनीच्या या अनपेक्षित निर्णयाची माहिती दिली. मात्र, स्वत: धोनीने यासंदर्भात अजूनपर्यंत कोणतेही भाष्य केलेले नाही. त्यामुळे धोनीच्या कर्णधारपदाच्या या तडकाफडकी राजीनाम्याचे कारण अद्यापदी गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, धोनीच्या राजीनाम्याचे वृत्त समजल्यानंतर सोशल मिडीयावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत.
टीम इंडियाला अव्वल आणणारा कप्तान
धोनीने भारताला आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये संघाला विजय मिळवून दिला. भारताला कसोटीचे अव्वल स्थान सर्वप्रथम गाठून देणाराही धोनीच होता. धोनीनेच युवा खेळाडूंना संधी देत सध्याचा मजबूत संघ बनवला. महेंद्रसिंह धोनीलाच भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखले जाते. त्याने खेळलेल्या एकूण ९० कसोटी सामन्यांपैकी ६० सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करताना २७ सामन्यांत विजय मिळवला. तर १८ सामन्यांत भारताला पराभव स्वीकारावा लागला व १५ सामने अनिर्णित राहिले. धोनीने एकूण २८३ एकदिवसीय सामने आतापर्यंत खेळले आहेत. त्यापैकी १९९ सामन्यांमध्ये धोनीने कर्णधारपदाची धुरा व्यवस्थितपणे हाताळली. यात भारताला ११० सामन्यांमध्ये विजय, ७४ पराभव, ४ टाय अशी कामगिरी करता आली. ११ सामन्यांचा कोणताही निकाल लागू शकला नाही. एकूण ७३ टी-२० सामन्यांपैकी ७२ सामन्यांमध्ये धोनीने भारताचे नेतृत्व केले. त्यापैकी ४१ सामन्यांत भारताने विजय मिळवला, तर २८ सामन्यांमध्ये पराभवाचे तोंड पाहावे लागले. १ सामना टाय झाला तर २ सामने अनिर्णित राहिले.
शांतता हे यशाचे गमक !
वाईटातल्या वाईट परिस्थितीतही चेहऱ्यावर शांत भाव असणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या मनात काय चालले असेल याचा अंदाज कोणालाच येऊ शकत नाही. कदाचित हेच धोनीच्या यशामागचे गमक असले पाहिजे. धोनीने २०१४-१५ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात थेट निवृत्तीच जाहीर केली होती. त्यावेळी एकाही संघसहकाऱ्याला याचा अंदाज नव्हता. आताही इंग्लंड संघाविरुद्ध मालिकेला सुरुवात होण्यास काही दिवस शिल्लक असतानाच धोनीने कर्णधारपद सोडले. सध्या धोनीने केवळ कर्णधारपद जरी सोडले असले तरी कोणीच सांगू शकत नाही की तो आणखी किती काळ संघासोबत राहील.