गुजरातचा निकाल भाजपसाठी धक्कादायक असेल!

0

नवी दिल्ली : गुजरातमधील जनतेत भाजपविरोधात प्रचंड संताप आहे. तेथील जनतेचे मत आता बदलत आहे. त्यामुळे गुजरातचा निकाल भाजपसाठी धक्कादायक असेल, असे मत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले, मला संपूर्ण विश्वास आहे की ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी होईल, 92 जागांचा प्रश्न नाही. निवडणूक पूर्णपणे एकतर्फी असेल कारण यंदा गुजरातमध्ये भाजपबाबत बराच राग आहे. जे व्हिजन द्यायचे होते ते व्हिजन भाजप आणि मोदीजी देऊ शकले नाही. त्यामुळे जनतेच्या मतांमध्ये परिवर्तन होत आहे. आता भाजप आम्हाला नाही, तर गुजरातलाच घाबरत आहे, असा टोलाही त्यांनी हाणला.

आज मतदान, मोदी-शहांची प्रतिष्ठा पणाला
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदान गुरुवारी (दि.14) होत आहे. मतदानाच्या एक दिवसआधी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांनी दावा केला, की गुजरातेत काँग्रेस बहुमताने जिंकेल, इतकेच नाही तर निकाल हा सगळ्यांना थक्क करणारा असेल. या निवडणुकीकेडे देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. मी गेल्या तीन-चार महिन्यापासून गुजरातचा मूड पाहतोय, मला पूर्ण विश्वास आहे की, भाजपला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल, कारण गुजरातमध्ये भाजपबाबत प्रचंड राग आहे हे मला जाणवले, असेही गांधी यांनी या मुलाखतीत सांगितले.

डॉ. सिंग यांच्याबद्दल बोलणे मोदींना शोभले नाही!
मोदींनी दिलेल्या काँग्रेसमुक्त भारत या नार्‍याबाबत बोलताना राहुल म्हणाले, काँग्रेस पक्ष जुनी विचारधारा आहे, ती भारतमुक्त होऊ शकत नाही. काँग्रेसची जी विचारधारा आहे ती आणखी रुजवण्याचा माझा प्रयत्न असेल. प्रेमाने राजकारण करा, आजकाल राजकारणात ज्या पद्धतीने बोलले जाते ते चुकीचे आहे. ते देशाला शोभत नाही. वैचारिक मतभेद हे असतातच पण तरीही थोडे तारतम्य बाळगून बोलले गेले पाहिजे. जर देश काँग्रेसमुक्त झाला तर नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणातील अर्धावेळ काँग्रेसला का दिला असता? असा सवालही राहुल यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी बोलताना मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्याचा राहुल यांनी पुन्हा निषेध केला. मणिशंकरजी जे बोलले ते माझ्यासाठी कधीही स्वीकारण्यायोग्य नाही, अशा शब्दात पंतप्रधानांबाबत आपल्या पक्षात बोलले जाणार नाही, मोदींना आमच्याबाबत काहीही बोलू दे. पण आमच्या पक्षातील लोकं त्याच्याबाबत आक्षेपार्ह बोलणार नाहीत. पंतप्रधान हे भारताचे प्रतिनिधीत्व करतात. त्या पदाचा मान हा राखलाच गेला पाहिजे, असेही राहुल म्हणाले. डॉ. मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानी लोकांशी बैठक केली, या मोदींनी केलेल्या आरोपावर टीका करताना एखाद्या माजी पंतप्रधानाबाबत अशा पद्धतीने पंतप्रधानांनी बोलणे हे त्यांना शोभत नाही, असा टोला राहुल यांनी लगाविला.