धुळे- धुळ्याकडून गुजरातकडे निघालेल्या ट्रक चालकाला साक्री रोडवरील श्रीराम कॉम्प्लेक्सजवळ सहा तरुणांनी ट्रकवर दगडफेक करून लुटण्याची घटना शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. शहर पोलिसांनी तपासचक्रे फिरवल्यानंतर सहा तरुणांना ताब्यात घेण्यात आली. त्यातील तीन अल्पवयीन असल्याचे सांगण्यात आले. धुळ्याकडून गुजरातकडे निघालेला ट्रक (जी.जे.16 व्ही.6717) हे ट्रक चालक हबीब अली पटेल (41, रा.मनबूर, जि.भरूच, गुजरात) घेवून जात असताना साक्री रोडवर ट्रकच्या दर्शनी भागावर तरुणांच्या टोळक्याने दगडफेक केल्याने दर्शनी काच फुटला. चालकाने ट्रक थांबवल्यानंतर तरुणांनी ट्रक चालकास मारहाण करीत त्याच्याकडील तीन हजार 800 रुपयांची रोकड लुटली. ट्रक चालकाने पोलिसांनी माहिती दिल्यानंतर तासाभरातच अमोल गणेश इंगळे (20), बंटी सुरैश बैसाणे (19), धनंजय (सोनू) मुकेश कानडे (19) यांच्यासह अन्य अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश चौधरी, एपीआय व्ही.एन.ठाकरे, एएसआय बैरागी, मुख्तार मन्सुरी, कबीर शेख, गणेश चौधरी, योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, पंकज खैरमोडे आदींनी ही कारवाई केली.