अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांची कारवाई ; रोकड व चारचाकीसह साडेतेवीस लाखांचा मुद्देमाल जप्त
धुळे- पोलीस असल्याचे भासवून गुजरातच्या व्यापार्याचे अपहरण करीत त्याच्याकडील 28 लाखांच्या रोकडवर डल्ला मारणार्या मुंंबईतील ओशीवरा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारासह चौघांच्या मुसक्या धुळे पोलिसांनी अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली आवळल्या आहेत. पोलिसांच्या या कारवाईनंतर अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशी घडली होती घटना
अमरतभाई हिराभाई पटेल (43, उमियानगर मोढेरा, ता.वेचराजी, जि.म्हैसाणा गुजराथ, ह.मु.ईश्वर कॉलनी, जळगाव) हे व्यापारी धुळे बसस्थानकावर 16 मे रोजी जळगाव-नंदुरबार बसने धुळे स्थानकावर उतरले तर सुरत जाण्यासाठी बसमध्ये बसण्यापूर्वीच पोलीस असल्याचे दर्शवून आरोपींनी त्यांना ताब्यात घेत इनोव्हा कारमध्ये बसवून त्यांचे अपहरण केले तर त्यांच्याकडील 28 लाख 10 हजारांची रोकड लूटत तसेच त्यांच्या मोबाईलमधील बॅटरी व सीम काढून त्यांना धुळे-नगाव रोडवरील तिसगाव ढंढाणे गावाच्या शिवारात सोडले होते. या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर तपास सुरू असतानाच गुप्त माहितीनुसार आरोपींना अटक करण्यात आली.
या आरोपींना अटक
प्रथमेश पांडुरंग खवनेकर (24, रा.66. इंदिरानगर, बांद्रेकर वाडी, योगेश्वरी पूर्व, मुंंबई), विजय मनोहर चंदणे (29, रा.कल्याणी इंदिरानगर, घ.नं.23, जोगेश्वरी, पूर्व मुंबई), प्रवीण सुरेश सावंत (33, रूम नं.2, शिवसागर चाळ, महाराष्ट्र नगर, कुरार विल्हेज, मालाड पूर्व, मुंबई नंबर 97), संजय देवराम पवार (50, हवालदार ओशीवरा पोलीस ठाणे, न्यू म्हाडा, पोलीस क्वार्टर, बिल्डींग नंबर एक, रूम नंबर 507, मुंबई साईसिद्धी बिल्डींग, पाचवा माळा, रूम नंबर 1504 प्रतापनगर, जोगेश्वरी पूर्व मुंबई) या आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 11 लाख 56 हजारांच्या रोकडसह 12 लाख रुपये किंमतीची इनोव्हा मिळून 23 लाख 56 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अटकेतील आरोपींना न्यायालयात हजर केले असता 25 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
यांनी केली कारवाई
धुळ्याचे अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, राजपूत, किरण जगताप, योगेश चव्हाण, पंकज खेरमोडे, भामरे, दिनेश परदेशी, विनायक सोनवणे, संदीप पाटील, मुख्तार मन्सुरी, संजय जाधव, आखडे, असई बैरागी, मिलिंद सोनवणे, खैरनार, प्रल्हाद वाघ, दिनेश शिंदे, दामोदर आदींनी शहरातील गुन्हेगारांना चेक करण्यासह सीसीटीव्ही तपासण्याची कामगिरी बजावली तसेच उपनिरीक्षक स्वप्नील राजपूत, सायबर सेलचे हवालदार संजय पाटील व त्यांच्या पथकाने मुंबई येथे जावून गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा (एम.एच.02 ए.यु.9480) चा शोध घेतला.