गुजरातमधील तीन युवक शिलेदार

0

गोध्रा प्रकरणानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीनंतर गुजरातमधील राजकीय समीकरणे बदलली. दंगलीचा फायदा घेऊन नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी मुदतपूर्व निवडणुका घेण्यास भाग पाडले. त्यात मोदींना पुन्हा विजय मिळाला. त्यामुळे महात्मा गांधींचा गुजरात धर्मामध्ये विभागाला. यापूर्वी गुण्यागोविंदाने नांदणारे हिंदु-मुस्लीम एकमेकांकडे संशयाने पाहू लागले. धर्मनिरपेक्ष ही गुजरातची ओळख पुसली गेली. आता गुजरात गांधींच्या नव्हे तर मोदींच्या नावाने ओळखला जाऊ लागला.आता तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीच्या मर्जीनुसार आता गुजरातचा कारभार चालतो. त्यांचा शब्द अंतिम मानला जातो. गुजरातच्या विधानसभा निवडणुका डिसेंबर महिन्यात होत आहेत. या निवडणुका एकतर्फी होतील, अशी चर्चा होती पण काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीना मिळणारा प्रतिसाद पहाता निवडणुका एकतर्फी होणार नाहीत. हे स्पष्ट आहे. गुजरातमध्ये साम, दाम, दंड, भेद वापरुन गुजरातमधील भाजप सरकार विधानसभा निवडणुकांना सामोरे जात आहे पण गुजरातमधील हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवानी या तीन युवकांनी या सरकारसमोर चांगले आव्हान उभे केले आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता आणि या तीन युवकांना मतदारांनी साथ दिल्यास निकाल वेगळे आल्यास आश्‍चर्य वाटायला नको. गुजरात मधील पाटीदार आंदोलनाच्या निमित्ताने हार्दिक पटेल हा चेहरा समोर आला. या आंदोलनाची दखल फक्त गुजरातने नव्हे तर देशाने घेतली. यामुळे हार्दिक ला देशभर प्रसिद्धी मिळाली. हार्दिक ची ओळख खर्‍या अर्थाने झाली ती 25 ऑगस्ट 2015 रोजी. या दिवशी अहमदाबाद येथील जीएमडीसी मैदानावर पाटीदार समाजाचा एक मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यासाठी पाच लाखापेक्षा जास्त लोक रस्त्यावर आले होते.

या मेळाव्याने गुजरात सरकारची पाचावर धारण बसली. या मेळाव्यानंतर हार्दिक ला बराच छळ सहन करावा लागला. पण त्याने भाजप सरकारसमोर नांगी टाकली नाही. भाजपविरोधी भूमिका कायम ठेवली. गुजरात मध्ये पटेल समाज 20 टक्के आहे. राज्यातील 182 विधानसभा जागांपैकी 70 जागांवर या समाजाचा प्रभाव आहे. गेली दोन दशके हा समाज भाजपसोबत आहे. हा समाज भाजपचा परंपरागत मतदार समजला जातो. तो आता नाराज आहे.भाजपने या समाजाची नाराजी दूर करण्या ऐवजी या आंदोलनामध्ये फूट पाडण्यास सुरुवात केली आहे.या समाजाची नाराजी कायम राहिली तर भाजपला ही निवडणूक सोपी नाही.पटेल आरक्षणाच्या विरोधात आवाज उठवणार्‍या अल्पेश ठाकोर या युवकाकडेही गुजरातची जनता आशेने पाहत आहे.पटेलांसमोर या सरकारने गुडघे टेकले तर हे सरकार उखडून फेकू, असा इशारा अल्पेश ठाकोर ने गुजरात सरकारला दिला आहे. पाच वर्षापूर्वी अल्पेशने क्षत्रिय-ठाकोर सेना स्थापन केली. त्याचे वडील खोदाभाई ठाकोर हे काँग्रेसचे नेते होते. आपले नेतृत्व विस्तारण्यासाठी मागासवर्गीय आणि आदिवासी समाजालाही गेल्या वर्षी प्रजासत्ताकदिनी अल्पेशने सोबत घेतले. त्यामुळे ओबीसी,मागासवर्गीय आणि आदिवासींचा ओएसएस मंच स्थापन केला. ओबीसी असलेल्या 146 जातींना अल्पेशने एकत्र आणले.गुजरात मधील 66 विधानसभा जागांवर ओबीसींचा प्रभाव आहे. त्याने दारूबंदी आणि बेरोजगारी हे या निवडणुकीतील प्रमुख मुद्दे केले आहेत. गुजरातमध्ये दारुबंदी असताना सर्वाधिक दारु गुजरात मध्ये विकली जाते,असा अल्पेश चा आरोप आहे.संपूर्ण राज्यात 40 ते 50 हजार कोटींची अवैध दारु विकली जाते त्यासाठी सरकारी कर्मचारी आणि राजकारण्यांना 200 कोटींची लाच दिली जाते, असेही त्याचे म्हणणे आहे.

अल्पेशने गुजरातच्या ग्रामीण भागातील 80 विधानसभा मतदारसंघात बुथनिहाय संघटन केले आहे.गेल्या अनेक निवडणुकांपासून ओबीसी समाज हा भाजपसोबत आहे.यावेळी मात्र हा समाज नाराज आहे. अल्पेशने आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.त्यामुळे त्याचा ओएस एस मंच कितपत काँग्रेससोबत येतो हे येणार्‍या निवडणूक निकालातून स्पष्ट होईल.’अभियान’या गुजराती साप्ताहिकात पत्रकारिता करणारा जिग्नेश मेवानी या दलित युवकाचे नेतृत्व उनाच्या घटनेने पुढे आले.उनामध्ये गोरक्षकानी दलितांना मारहाण केली.या घटनेचे पडसाद देशभर उमटले.या विरोधात जिग्नेश याने आवाज उठवला.त्याने वीस हजार दलितांना मेलेली जनावरे आणि मैला न उचलण्याची शपथ दिली.या आंदोलनाला सर्व वर्गाची साथ मिळाली.या आंदोलनात मुस्लिमही सहभागी झाले.जिग्नेश चे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अहमदाबाद येथेच झाले.तेथेच त्याने जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशन चा डिप्लोमा केला. नंतर त्याने 2004 ते2007 या काळात ’अभियान’मध्ये पत्रकारिता केली. तो वकीलही आहे.उनाच्या घटनेनंतर त्याने अहमदाबाद ते उना अशी ’दलित अस्मिता यात्रा’काढली. या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. वीस हजार दलित या यात्रेत सहभागो झाले.त्यातूनच त्याने ’राष्ट्रीय दलित अधिकार मंच’ स्थापन केला. गुजरात मध्ये सात टक्के दलित मतदार आहेत.या दलितांमध्ये जिग्नेश ने विश्‍वास निर्माण केला आहे. आता याचे मतदानामध्ये कसे रुपांतर होईल. याकडे त्याचे लक्ष आहे. उनाच्या घटनेनंतर दलित समाजामध्ये जागृती आली आहे. हार्दिक पटेल,अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवानी हे गुजरातमधील तीन युवक व्यवस्थेविरुध्द संघर्ष करत आहेत. भाजप विरुध्द लढत आहेत.पण यांची लढाई स्वतंत्रपणे सुरु आहे. पण हे तीनही युवक संघटितपणे लढले असते तर यापेक्षा वेगळे चित्र दिसले असते. या घटनेने एक चांगले चित्र असे की या तिघानाही सत्ताधारी पक्षाकडून वेगवेगळी आमिषे दाखवण्यात आली पण कोणत्याही आमिषाला ते बळी पडले नाहीत.

गुजरात मधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देउन त्यांनी स्वतंत्र चूल मांडली आहे. सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी राज्यसभा निवडणुकीत बंड केले, पण अहमद पटेल यांचा विजय झाला. काँग्रेस मध्ये निष्ठेला किंमत असते, त्यामुळे वाघेलापेक्षा अहमद पटेल यांच्यावर सोनिया गांधीनी विश्‍वास ठेवला. ही निवडणूक राहुल गांधी यांनी प्रतिष्ठेची केली आहे. आपले नेतृत्व सिध्द करण्याची संधी त्यांना या निवडणुकीनिमित्ताने चालून आली आहे. गुजरात मध्ये काँगे्रसची सत्ता आली नाही तरी जागा वाढू शकतात, असा राजकीय पंडिताचा होरा आहे. आता या तीन युवकांच्या असंतोषाला मतदार कितपत दाद देतात यावर निवडणूक निकालाचे गणित अवलंबून आहे. सर्व मतभेद विसरून हार्दिक पटेल आणि जिग्नेश मेवानी यांनी भाजप विरोधी शक्तिंना मदत केल्यास आश्‍चर्यकारक निकाल येवू शकतात. अल्पेश ठाकोर हा याआधीच काँग्रेसमध्ये सामिल झाला आहे.

नवनिर्माण ते चिमणचोर
गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांच्या नवनिर्माण आंदोलनाने काँग्रेसला जेरीस आणले. याच चिमणभाईना काँग्रेसविरोधी कौल देवून गुजरातच्या जनतेने सत्तेवर आणले, मात्र नंतर चिमणभाई पटेल काँग्रेसमध्ये सामिल झाले. इंदिरा गांधीच्या आमिषला बळी पडले. पुढे याच चिमणभाईना ‘ चिमणचोर’ असे गुजरातच्या जनतेने संबोधले.
हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवानी या तीन युवकांनी भाजपच्या सर्व ऑफर्स नाकारल्या आहेत. सत्ताधार्‍यांच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता ते समर्थपणे भाजपशी लढत आहेत. मात्र, या लढाईला संघटितपणा आला असता तर, गुजरातमध्ये वेगळे चित्र दिसले असते.

– नितीन सावंत
सहसंपादक, जनशक्ति
9892514124