गुजरातमध्ये इसिसच्या संशयितांची धरपकड

0

अहमदाबाद । दहशतवादाच्या विरोधातील लढाईत गुजरात पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. अहमदाबादच्या अतिरेकी विरोधी पथकाने रविवारी इसिसशी संबंधित असलेल्या दोघा संशयितांना अटक केली आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका संशयिताला भावनगर आणि दुसर्‍याला राजकोटमधून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वसीम आणि नईम रामोदिया अशी या संशयितांची नावे आहेत. यातील एक क्रिकेट पंच आरिफ रामोदिया यांचा मुलगा असून दुसरा त्यांचा भाऊ आहे. आरिफ नुकतेच सौराष्ट्र विद्यापीठाच्या सेवेतून निवृत्त झाले असून ते परिवारसहित राजकोटमध्ये नेहरूनगर भागात वास्तव्यास आहेत.

या दोघा संशयितांकडून देशी बॉम्ब, गन पावडर, मास्क, कॉम्प्युटर आणि इतर सामान जप्त करण्यात आले आहे. दहशतवादविरोधी पथकाचे उप अधीक्षक के. के. पटेल म्हणाले की या दोन्ही आरोपींच्या हालचालींवर पोलिसांनी गेले दीड वर्षभर पाळत ठेवली होती.

ट्विटर, फेसबुक आणि टेलिग्राम नावाच्या मेसेजिंग अ‍ॅपच्या माध्यमातून इसिसशी संपर्क ठेवल्याचा आरोप या दोघांवर ठेवण्यात आला आहे. पाश्‍चिमात्य राष्ट्रांमध्ये घडवून आणलेल्या लोन वुल्फ पद्धतीच्या हल्ल्यांप्रमाणे भारतातही तशाच पद्धतीने हल्ले घडवून आणण्याची योजना तयार केली होती असे पोलिसांचे म्हणणे आहे.

लोन वुल्फ पद्धतीने हल्ला करताना दहशतवादी मोठी टोळीचा वापर करत नाहीत. अशा पद्धतीचे हल्ले दहशतवादी एकट्यानेच घडवून आणतात. त्यामुळे असे हल्ले रोखणे कठीण असते. पुढील काही दिवसांमध्ये हे दोघेजण बॉम्ब स्फोट घडवून आणणार होते असे पोलिसांनी सांगितले.

लोन वुल्फ अ‍ॅटॅक म्हणजे काय?
लोन वुल्फ अ‍ॅटॅक हा एकटा व्यक्ती घडवून आणतो. त्याकरता त्याला जास्त सहकार्‍यांची आवश्यकता नसते. अशा पद्धतीच्या हल्ल्यात जास्तीत जास्त लोकांना त्याची झळ बसते. ज्याप्रमाणे कोल्हा एकटाच सावजावर हल्ला करतो त्याप्रमाणे या हल्ल्याची रणनीती आहे. अशा प्रकारच्या हल्ल्यात छोटी स्वरूपाची हत्यारे, चाकू, ग्रेनेड यांचा वापर केला जातो. कुठल्याही नेत्याविना हा हल्ला घडवला जातो. लोन वुल्फ पद्धतीने देशातील विविध मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळांवर हल्ले करण्याची या दोघांची योजना होती. त्यामुळे पुढील कारवाईच्या दृष्टीने जास्त माहिती देण्यास अहमदाबाद एटीएसचे अधीक्षक हिमांशु शुक्ला यांनी नकार दिला.

लोन वुल्फची नोंद
लोन वुल्फ प्रकाराच्या हल्ल्यात एकट्या दहशतवाद्याचा शोध घेणे तपास संस्थासाठी कठीण असते. शिवाय अशा स्वरूपाचे हल्ले करण्यासाठी खर्चही खूप कमी असतो. इसिसने छापलेल्या इन्स्पायर या पुस्तकात लोन वुल्फ प्रकाराच्या हल्ल्याची नोंद घेण्यात आली आहे.