गुजरातमध्ये काँग्रेसला अच्छे दिन!

0

गडचिरोली : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत चर्चा सुरु आहे. गुजरातमध्ये काँग्रेसला अनुकूल परिस्थिती असून, तिथे काँग्रेसला अच्छे दिन येतील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. गडचिरोलीत बुधवारी शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत ते बोलत होते.

हे कायद्याचे राज्य आहे का?
शरद पवार म्हणाले, मी लाभार्थी म्हणून मोठमोठ्या जाहिराती दिल्या जात आहेत. पण त्यात कर्जमाफीचे किती लाभार्थी आहेत, हे कळलेले नाही. नागपूरमध्ये हत्यांचे प्रमाण वाढत आहे. सांगलीतील एका तरुणाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनाच अटक करण्यात आली. या घटना धक्कादायक आहेत. हे कायद्याचे राज्य आहे का? राज्यात ज्या घटना घडतात त्यावर मुख्यमंत्र्यांची गृहमंत्री म्हणून मी एकही प्रतिक्रिया ऐकलेली नाही.

केंद्राकडून दिशाभूल
केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने देशभरात गोरक्षकाचा सुळसुळाट झाला असून, यामुळे दलित आणि मुस्लिमांना असुरक्षित वाटत आहे. राष्ट्रीय कृषी विकासाचा दर फक्त 3 टक्के असून, केंद्र सरकार याबाबत दिशाभूल करत आहे. लोकशाहीच्या माध्यमातून जनतेने स्वतंत्र विदर्भाची मागणी लावून धरली तरच त्यांना पाठिंबा देऊ, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

गडचिरोलीसाठी आबांचे योगदान
दिवंगत आर. आर. पाटील यांच्या आठवणींना उजाळा देताना पवार म्हणाले, हैदराबाद व महाराष्ट्राला जोडणारा गडचिरोली जिल्हा असून, या जिल्ह्याचा अजूनही विकास झालेला नाही. दळणवळणाच्या सुविधाही नाहीत. याची जाणीव आर. आर. पाटील यांना झाली आणि त्यांनी स्वतःहून गडचिरोलीचे पालकमंत्रिपद मागितले होते. गडचिरोलीत कायदा व सुव्यवस्थेचा मुख्यप्रश्‍न आहे. पण मला त्यापेक्षा आर्थिक कारण महत्त्वाचे वाटते. आर. आर. पाटील यांनीही त्यावरच काम केले होते, असेही पवार म्हणाले.