अहमदाबाद : सुरतमध्ये काँग्रेस आणि पाटीदार आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. काँग्रेसने रविवारी रात्री 77 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये भेदभाव केल्याचा आरोप करत पाटीदार समितीच्या कार्यकर्त्यांनी सुरतमधील काँग्रेस कार्यालयात काम होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेल सोमवारी काँग्रेसला पाठिंबा जाहीर करणार असतानाच हा प्रकार घडला आहे.
उमेदवारी यादीवरून गोंधळ
गुजरातमध्ये सत्तेवर आल्यास पटेलांना आरक्षण देण्याबाबत काँग्रेस आणि हार्दिक पटेल यांच्या पाटीदार अनामत आंदोलन समितीमध्ये एकमत झाल्याची घोषणा रविवारी करण्यात आली. या आरक्षणाबाबतचे तपशील आणि निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देण्याबाबत हार्दिक पटेल सोमवारी राजकोटमधील सभेत घोषणा करतील, असेही पाटीदार समितीचे संयोजक दिनेश भंभानिया यांनी सांगितले होते. मात्र रविवारी रात्री काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी 77 उमेदवारांची यादी जाहीर केली आणि कार्यकर्ते भिडले.
विश्वासात न घेतल्याचा आरोप
सुरतमध्ये पटेल समाजाचे वर्चस्व असलेल्या वरच्चा रोड या मतदारसंघातून काँग्रेसने प्रफुल्ल तोगडिया यांना उमेदवारी दिली. रात्री उशिरा पाटीदार आंदोलन समितीचे कार्यकर्ते प्रफुल्ल तोगडिया यांच्या कार्यालयाबाहेर जमले. काँग्रेस कार्यकर्ते आणि पाटीदार समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीदेखील झाली. तिकीट वाटप करताना पाटीदार समितीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. आम्हाला विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर केली, असा आरोप भंभानिया यांनी केला. आम्ही काँग्रेसच्या कार्यालयांवर हल्ला करुन विरोध दर्शवणार, असा इशाराच त्यांनी दिला. रविवारी रात्रीच्या या घटनेनंतर हार्दिक पटेल सोमवारी काँग्रेसला पाठिंबा देण्याची घोषणा करणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे.