नवी दिल्ली/गांधीनगर : राज्यसभेच्या तीन जागांसाठी गुजरातमध्ये घोडेबाजार तेजित आलेला आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार व काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल यांच्या जागांकडे देशाचे लक्ष लागले आहे. पटेल यांना पाडण्यासाठी भाजपने जोरदार रणनीती आखली असून, दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसने आपले 44 आमदार बेंगळुरूला रवाना केले आहेत. आतापर्यंत काँग्रेसच्या सात आमदारांनी पक्ष सोडला असल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढलेली आहे. सद्या तीनपैकी दोन जागा भाजपकडे असून, एक जागा काँग्रेसकडे आहे. ही तिसरी जागाही जिंकण्यासाठी भाजपने जोरदार तयारी चालवलेली आहे. भाजपच्या दोन जागांवर शाह व इराणी उभे आहेत. तर तिसर्या जागेवर भाजपने काँग्रेस बंडखोर आ. बलवंतसिंह रजपूत यांना उभे केले आहे. रजपूत यांनी अहमद पटेल यांना जोरदार आव्हान उभे केलेले आहे.
भाजपने उभा केला काँग्रेस बंडखोर!
काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल यांची जागा काँग्रेसला राखायची असेल तर त्यांना 47 आमदारांचा पाठिंबा हवा आहे. काँग्रेसच्या 57 आमदारांपैकी सात आमदारांनी काँग्रेस पक्षाशी रितसर फारकत घेतली आहे. त्यामुळे आता काँग्रेसकडे 50 आमदारांचा पाठिंबा आहे. पक्ष सोडण्याचा सिलसिला सुरुच राहिला तर अहमद पटेल यांचा पराभव निश्चित आहे. काँग्रेसचे आमदार फोडून आ. बलवंतसिंह रजपूत यांना निवडून आणण्यासाठी भाजपने जोरदार घोडेबाजार चालविल्याचा आरोपही काँग्रेस नेतृत्वाने चालवला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर टीका करताना सांगितले, की भाजप गुजरातमधून तीन जागा लढवित आहे. जेव्हा की त्यांच्याकडे दोनच जागा जिंकण्याची क्षमता आहे. काँग्रेस आमदारांना फोडून ते तिसरी जागा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप सत्तेची लालची झाली आहे, असेही सुरजेवाला म्हणाले.