गुजरातमध्ये दे धक्का

0

गुजरात विधानसभेत शंकर सिंह वाघेला यांचे 16-17 समर्थक आमदार आहेत. त्यापैकी सहाच आमदारांनी राजीनामे दिले आहेत. मात्र, या सहा आमदारांनी राजीनामे दिल्यानंतरही काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांचा धोका संभवतो आहे.

या राज्यसभेत निवडणुकीत भाजपने पक्षाध्यक्ष अमित शहा आणि माहिती प्रसारण व वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांना उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शंकर सिंह वाघेलांचे निकटवर्तीय बलवंत सिंह राजपूत यांनाही भाजपने उतरवले आहे. राजपूत यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अमित शहा आणि स्मृती इराणी यांना पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी पुरेशी मते भाजपकडे आहेतच, पण 31 अतिरिक्त मतेही भाजपकडे आहेत. ही 31 मते राजपूत यांना देण्याचे भाजपने ठरवले आहे. राज्यसभेत जाण्यासाठी 45 मतांची आवश्यकता आहे. ही मते मिळवण्याची रणनीती भाजपने आखली आहे. अजून काही आमदार राजीनामा देतील, अशी भाजपनेत्यांना आशा आहे.

राष्ट्रपती निवडणुकीत व्हिप नसतो. त्यामुळे आमदारांना मोकळे रान असते. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांना 11 काँग्रेस आमदारांची मते मिळाली होती. आतापर्यंत सहाच काँग्रेस आमदारांनी राजीनामे दिले आहेत. आमदारांनी राजीनामे देण्यापूर्वीच 40 काँग्रेस आमदारांना बंगळुरूला नेण्यात आले आहे.राज्यात भाजपचे सरकार आहे. साम-दाम-दंड-भेद वापरून या आमदारांना फोडले जाईल. त्यांच्यावर मानसिक दबाव टाकला जाईल. त्याचबरोबर हे आमदार भाजपच्या कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये, यासाठी काँग्रेसने ज्या राज्यात काँग्रेसचे सरकार आहे. तेथे म्हणजे कर्नाटकमध्ये आमदारांना नेऊन ठेवले आहे. परंतु, हे आमदार 40 च असल्याने अजून पाच मतांची बेगमी अहमद पटेल यांना करायची आहे. गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन आमदार आहेत आणि जेडीयूचा एक आमदार आहे. ही मते काँग्रेसला मिळतील, अशी काँग्रेसला आशा आहे. शरद पवार हे एनडीएमध्ये आहे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने त्यांचे राजकारण सुरू आहे. ते पाहता त्यांची दोन मते अहमद पटेल यांना मिळतील असे सध्या तरी वाटत नाही. मी आत येऊ का? असे विचारत ते नितीशकुमार यांच्या अगोदरपासून भाजपच्या घराची कडी वाजवत आहेत. पण नरेंद्र मोदींनी तूर्त थांंबण्याचा त्यांना सल्ला दिला आहे. आवश्यकतेवेळी भाजप सरकार असो, त्यांचा विरोधाला विरोध नसतो तर तात्त्विक विरोध असतो असा तात्त्विक विरोध करत सत्ताधार्‍यांजवळ राहायची त्यांची इच्छा असेल तर आपले आमदार राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील, अशीही दुसरी भीती पवारांना आहे.

बिहारचे बदललेली राजकीय समीकरणे पाहता जेडीयूचा एकमेव आमदारही अहमद पटेल यांना मत देईल, याची शक्यता नाही. हार्दिक पटेलला पाठिंबा देणारे भाजपचे आमदार मलिन कोठादिया हे भाजप बंडखोर समजले जातात. हार्दिक पटेलच्या पाटीदार आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले कोठादिया पाटीदार मतांच्या राजकारणासाठी भाजप विरोधक झाले आहेत. पण त्यांनी राजीनामा न दिल्याने त्यांचे मत फुटण्याची शक्यता नाही. राज्यसभा निवडणुकीत गुप्त मतदान नसल्याने फुटण्यात संधी नाही. त्यामुळेच काँग्रेसच्या आमदारांनी राजीनामा देऊन अहमद पटेल यांना धडा शिकवण्यासाठी सज्ज झाले आहेत. एवढे करूनही अहमद पटेल फक्त 40 च आमदांना ताब्यात ठेवू शकले आहेत.

आयुष्यभर गांधी कुटुंबीयांची चमचेगिरी करणारे सोनिया गांधी यांचे सल्लागार म्हणून मिरवणार्‍या अहमद पटेल यांनी सर्व राज्यांमध्ये दुहीचे राजकारण केले. कोणत्याही एका नेत्याला मजबूत होऊ दिले नाही. जेथे सत्ता असेल तेथे ठीक आहे, पण सत्ता नसेल तेथेही इरश्ररपलश ेष झेुशी चे राजकारण केल्याने पक्ष वाढला नाही. गुजरातसारख्या राज्यामध्ये वाघेलांसारख्या लोकप्रिय नेत्याला थोडा फ्री हॅन्ड दिला असता तर आगामी निवडणुकीत वेगळे चित्र दिसले असते. हार्दिक पटेल सारख्या भाजपविरोधक असलेल्या युवक नेत्याला सोबत घेऊन भाजपला जेरीस आणता आले असते. सुरुवातीला अहमद पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी तडजोडीचे राजकारण केले. हेच तडजोडीचे राजकारण आता त्यांच्यावर उलटले आहे. 40 आमदारांना घेऊन कर्नाटकात परागंदा होण्याची वेळ याच जोडगोळीने अहमद पटेल यांच्यावर आणली आहे.

बंडखोर काँग्रेस नेते शंकरसिंह वाघेला हे भाजपमधून फुटून काँग्रेसमध्ये गेले होते. केशुभाई पटेल यांच्याविरोधात त्यांनी पहिल्यांदा केलेले बंड तत्कालीन भाजप नेत्यांनी शमवले होते. पण दुसर्‍यांदा पुन्हा बंड करून ते काँगे्रसच्या साथीने गुजरातचे मुख्यमंत्री झाले. यूपीएमध्ये ते केंद्रीय मंत्रीही होते. मूळ संघाचे असलेले वाघेला गेली अनेक वर्षे भाजपविरोधात लढत आहेत. आता त्यांनी जाहीर केले आहे की, आपण भाजपमध्ये जाणार नाही. पण भाजपची कमिटमेंट असल्याशिवाय त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला आहे?

हे सामान्य माणसालाही समजेल. एवढे वर्ष बाहेर असलेले शंकरसिंह वाघेला स्वगृही परतणार आहेत, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. वाघेलांसारखे ज्येष्ठ नेते काँग्रेसबाहेर पडत आहेत, याचा अर्थ काँग्रेस हे बुडते जहाज आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी पक्ष एकसंघ देऊ शकत नाहीत, अशी टीका केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली आहे. सद्यःस्थितीत या टीकेत तथ्य आहे. मात्र, भाजप काही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेली नाही. आणीबाणीनंतर बडे बडे नेते इंदिरा गांधींना सोडून गेले. इंदिराजी जिद्दीने देशभर फिरल्या आणि 1980 साली पुन्हा पक्षाला गतवैभव प्राप्त करून दिले. त्यामुळे काँग्रेसमुक्त देश हे भाजपचे स्वप्न काही पूर्ण होणार नाही. काँग्रेसमुक्त गुजरात अशी भाषा काही गुजरातमधील भाजप नेते करत आहेत, पण घोषणा करण्याएवढे हे सोपे नाही. हार्दिक पटेल नावाचा वारू शांत आहे. तो उधळला तर काहीही होऊ शकते, हे भाजप नेत्यांनी लक्षात घ्यायला हवे, अन्यथा सत्तेची नशा कोणत्याही क्षणी उतरू शकते.