गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 68 टक्के मतदान

0

गुजरात । गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरूवात झाली होती. लोकांनी अत्यंत उत्साहात येऊन मतदान केले 19 जिल्ह्यातील 89 जागांसाठी हे मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यात एकूण 68 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. 89 जागांसाठी तब्बल 977 उमेदवार रिंगणात आहेत. या सगळ्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. मतदानाच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील मतदारसंघांचा समावेश होता. दुसर्‍या टप्प्यात 14 डिसेंबरला मतदान होणार आहे. मतमोजणी 18 डिसेंबरला होईल.

गेली 22 वर्षे सत्तेत असलेला भाजप आणि सरकारविरोधी असंतोषाला बळ देत पाटीदार, ओबीसी आणि दलित समाजाच्या युवा नेतृत्वाशी संधान बांधणारी काँग्रेस या दोन पक्षांत निर्णायक लढतीची पहिली फेरी रंगली. या निवडणुकीत एका बाजुला प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी भाजपने पाच ते सहा हजार कार्यकर्त्यांची फळी उभी केली, तर दुसरीकडे प्राथमिक स्तरावरही कार्यकर्त्यांची फळ नसलेल्या काँग्रेसच्या राहूल गांधी यांनी मात्र भाजपसमोर आव्हान उभे केले आहे. पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमधील मतदारसंघ आहेत. सूरतसारखा महत्त्वाचा भाग असलेल्या दक्षिण गुजरातमधील शहरी भागांवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. गुजरातमधील एकूण मते लक्षात घेता भाजपकडे 47.8 टक्के तर काँग्रेसकडे 38.8 टक्के मतदार होते. ही नऊ टक्के मतांची दरी कमी करण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे.

भारत देशच माझे माता-पिता
काँग्रेसचे नेते सलमान निजामी म्हणातात मोदींचे आई-वडील कोण आहेत? अशी भाषा दुश्मनासाठी तरी कोणी वापरते का? मोदींची आई भारत माता आहे, तर मोदींचे वडील भारत देश आहे. या देशाने मला सर्व काही दिले, त्यामुळे देशाची सेवा करण्याचे मुलगा म्हणून माझे कर्तव्यच आहे.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

मोदींचे ‘भाषण’ हेच ‘शासन’
गेल्या 22 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. मात्र, यावेळी पंतप्रधानांच्या प्रचाराच्या भाषणातून ‘विकास’ हा शब्दच हरवल्याचे दिसते. ते केवळ भाषणेच करत आहेत. विकासावर बोलत नाहीत. त्यामुळे आता त्यांचे ‘भाषण’ हेच ‘शासन’ आहे काय? मी दहा प्रश्‍न उपस्थित केले होते. मात्र, अजूनपर्यंत मला त्यांची उत्तरे मिळालेली नाहीत.
– राहुल गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष

निवडणुकांसाठीच मोदी ओबीसी
आपण कनिष्ठ जातीतले आहोत असा प्रचार पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ निवडणुका जिंकण्यासाठीच करत आहेत. अन्यथा त्यांना ओबींच्या प्रश्‍नांंशी काहीही देणेघेणे नाही, ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करावे, अशी मागणी मी जेव्हा केली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्यावर ओरडले होते.
– नाना पटोले, माजी खासदार