गांधीनगर : गुजरात विधानसभा निकालानंतर नवे मुख्यमंत्री कोण होणार यावर पूर्णविराम लागला आहे. विजय रूपाणी यांची भाजप विधिमंडळच्या नेतेपदी सर्वानुमते निवड झाली असून, नितीन पटेल यांची उपनेतेपदी निवड झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विजय रूपाणी मुख्यमंत्री आणि नितीन पटेल हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण करतील, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. गांधीनगर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गुजरात भाजपचे प्रभारी असलेले भूपेंद्रसिंह चुडासमा यांनी विजय रूपाणी यांची विधिमंडळ नेता आणि नितीन पटेल यांची उपनेता पदासाठी प्रस्ताव मांडला, त्याला उपस्थित सदस्यांनी अनुमोदन दिल्यानंतर ही घोषणा करण्यात आली. रूपाणी लवकरच गुजरातच्या राज्यपालांना भेटून शपथ ग्रहण समारोह निश्चित करतील.
भाजपकडून पाटीदारांना चुचकारण्याचा प्रयत्न
भारतीय जनता पक्षाने गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा बहुमत मिळविले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या नेतृत्वखाली भाजप ही वाटचाल सुरु ठेवेल, असे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष जितु वाघाणी यांनी सांगितले. गुजरातच्या जनतेने भाजपवर दाखविलेल्या विश्वासावर आम्ही खरे उतरण्याचा पूर्ण प्रयत्न करू, असेदेखील ते यावेळी बोलले. पाटीदार पटेल समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्रिपदी पुन्हा नितीन पटेल यांची वर्णी लावून पाटीदार समाजाला काही प्रमाणात चुचकारण्याचा यानिमित्ताने प्रयत्न भाजपकडून झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर एका बाजूला गुजरातेत पुन्हा एकदा जैन समाजाचा मुख्यमंत्री निवडण्यात आल्याने पाटीदार समाजाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. गुजरातमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने 99 जागा जिंकत बहुमत मिळवले होते आणि त्यानंतर गुजरातेत सत्ता स्थापनेचा दावा केला होता. मात्र गुजरातमध्ये भाजपचा 150+ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा मनसुबा काँग्रेसने 80 जागा मिळवत धुळीस मिळवला होता.
स्मृती इराणींची मुख्यमंत्रिपदी वर्णी नाही!
दरम्यान, गुजरातमध्ये भाजप नेतृत्वबदल करेल आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने विजय रुपाणी आणि नितीन पटेल यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त करत, सगळ्या शक्यतांना पूर्णविराम दिला. गुजरातमध्ये भाजप रुपाणी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढला होता. त्यामुळे त्यांना हटवल्यास मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो, हा धोका लक्षात घेऊनच राज्यात नेतृत्व कायम ठेवण्यात आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.