गुजरातमध्ये भाजपचा पराभव होणार!

0

पुणे : गुजरातमध्ये मोदींचाच करिष्मा चालणार असून, भारतीय जनता पक्षाला निर्विवाद बहुमत मिळेल, असा एक्झिट पोल देणार्‍या सर्वच वृत्तवाहिन्या व सर्वेक्षण संस्थांना खोटे ठरवत, भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी शुक्रवारी धक्कादायक भाकित वर्तविले. गुजरातमध्ये भाजपला जबरदस्त फटका बसणार असून, मित्र पक्षांची मदत घेतली तरी तेथे सत्ता मिळणार नाही, असे भाकित खा. काकडे यांनी वर्तविले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी काकडे यांनी पुणे महापालिकेतील भाजपच्या विजयाबाबतही असेच भाकित वर्तविले होते. ते अगदी तंतोतंत खरे ठरले होते. दरम्यान, आपण आपली माणसे पाठवून गुजरातमध्ये सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, आपण हा अंदाज वर्तविला असल्याचेही खा. काकडे यांनी सांगितले. दुसरीकडे, खा. काकडे यांचे हे भाकित भाजपसह इतर राजकीय पक्षांनीही फेटाळून लावले आहे. गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाध्यक्ष अमित शहा यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना, भाजपच्या सहयोगी खासदाराने अशाप्रकारे विधान केल्याने भाजपची मोठी गोची झाली आहे.

गुजरातमध्ये माणसे पाठवून सर्वेक्षण केले : खा. काकडे
पुणे मिरर या वृत्तपत्राशी बोलताना खा. संजय काकडे यांनी सांगितले, की गेली अनेक वर्षे भारतीय जनता पक्ष गुजरातमध्ये सत्तेत आहे. परंतु, यंदाची स्थिती भाजपसाठी चिंताजनक आहे. दीर्घकाळ सत्तेत राहिल्याने यंदा भाजपला फटका बसण्याची दाट शक्यता आहे. गुजरातमधील मुसलमान हे भाजपवर नाराज असून, नरेंद्र मोदी हे गुजरातमध्ये मुख्यमंत्रिपदावर असताना त्यांचे जसे गुजरातवर लक्ष होते, तसे पंतप्रधान झाल्यापासून त्यांचे तेथे लक्ष देता आले नाही. गुजरातमध्ये मोदी यांच्या तोडीचा एकही उमेदवार भाजपला गेल्या तीन वर्षात सापडलेला नाही. विकासाचा मुद्दा हा भाजपच्या प्रचारातील मुख्य मुद्दा बनू शकला नाही. या सगळ्या बाबी पाहाता, मी स्वतः गुजरातमध्ये माणसे पाठविली व त्यांच्या माध्यमातून वस्तुनिष्ठपणे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार गुजरातमध्ये भाजपने गेल्या निवडणुकांत जो विजय मिळविला होता तशी कामगिरी करता येणे शक्य नाही, असेही खा. काकडे यांनी सांगितले. गुरुवारी गुजरातमधील मतदान संपल्यानंतर बहुतेक वृत्तवाहिन्या व सर्वेक्षण संस्था यांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलमधून भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज व्यक्त केला होता. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुढाकार घेत, अतिशय आक्रमक प्रचार केला होता. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय समुदयाचेही लक्ष लागलेले आहे.

खा. साबळे म्हणतात, खा. काकडेंचे भाकित खोटे!
गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागांसाठी मतदान झाले असून, गेली 22 वर्षे या राज्यात भाजपची एकहाती सत्ता आहे. भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी तोडीसतोड व समतोल राहून प्रचार केला होता. हा प्रचार प्रचंड परिणामकारक ठरलेला आहे. पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनीही भाजपच्या विरोधात आघाडी उघडून घणाघाती सभा घेतल्या होत्या. जिन्गेश मेवाणी, अल्पेश ठाकोर या तरुण नेतृत्वानेही काँग्रेसला पाठिंबा देऊन भाजपविरोधात प्रचार केला होता. त्यामुळे ही निवडणूक प्रचंड रंगतदार ठरली आहे. या आक्रमक प्रचाराचा काँग्रेसलाच फायदा होणार आहे. दरम्यान, खासदार काकडे यांच्या मताशी इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी असहमती दर्शविली आहे. भाजपचे खासदार अमर साबळे यांनी तर खा. काकडेंचे भाकित फेटाळून लावले. गुजरातमधील जनता भाजपच्या बाजूने असून, भाजपलाच सत्ता मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे भूमिपुत्र असून, गुजराती जनतेला त्यांचा अभिमान आहे. त्यामुळे गुजरातची जनता त्यांच्या नेतृत्वावरच विश्वास ठेवेल, जनतेचा त्यांच्यावर कुठलाही रोष नाही. खा. काकडे यांनी व्यक्त केलेले मत हे त्यांचे खासगी मत आहे, असेही खा. साबळे यांनी सांगितले.

भाजपला 92 पेक्षाही कमी जागा!
पुणे महापालिका निवडणुकीतही खासदार संजय काकडे यांनी असेच खासगी सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणातून भाजपला 92 जागा मिळतील, असे भाकित त्यांनी वर्तविले होते. त्यांचा हा अंदाज तंतोतंत खरा ठरला. महापालिका निवडणुकीत भाजपला तब्बल 98 जागा मिळाल्या होत्या. तशाच पद्धतीने खा. काकडे यांनी गुजरातमध्येदेखील निवडणूक सर्वेक्षण केले असून, तेथे भाजपला सत्तेपर्यंत पोहोचता येणार नाही, 92 पेक्षाही कमी जागा मिळतील, असा अंदाज वर्तविला आहे.