गुजरातमध्ये भीषण अपघात: फुटपाथवर झोपलेल्या १५ मजुरांना करुण अंत

0

पलोड: गुजरातमधील सुरतमध्ये मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात रस्त्याच्या कडेला झोपलेल्या १५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी रात्री साडेबाराच्या सुमारास सुरत जिल्ह्यातील कोसांम्बा येथे हा अपघात झाला आहे. अपघातात मृत पावलेले सर्वजण हे मजूर होते. पोटाची खळगी भरण्यासाठी मजुरी करणाऱ्यांना जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातामध्ये सहाजण जखमी झाले असून त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयामध्ये उपाचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात झाला तेव्हा घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार एका ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्याच्याकडेला झोपलेल्या मजुरांच्या अंगावर गेला. पोलिसांनी या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांना २ लाखांची घोषणा केली आहे. दुसरीकडे हे मजूर राजस्थान राज्यातील बंस्वारा येथील होते. दरम्यान राजस्थान सरकारने या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून मृत कुटुंबियांच्या वारसाला २ लाख रुपये तसेच जखमींना ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ही घोषणा केली.

सूरतमधील पलोड गावाच्या जवळ असणाऱ्या किम मांडवी रस्त्यावर हा अपघात झाला आहे. किम हाकर मार्गाजवळ एका ट्रकचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. रात्री बारानंतर झालेल्या या अपघातामध्ये ट्रक एका ऊसाच्या ट्रॅक्टरला धडकला. मांडवीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रकने जोरदार धडक दिल्यानंतर ट्रॅकवरील नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रकचा चालक आणि क्लिनरही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत.