गुजरातमध्ये 68.70 टक्के मतदान

0

गांधीनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी दुसर्‍या टप्प्यातील मतदान गुरुवारी घेण्यात आले. सायंकाळी पाच वाजता संपलेल्या मतदानाची आकडेवारी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली असून, सरासरी 68.70 टक्के मतदान झाल्याचे सांगितले आहे. यापूर्वी 9 तारखेला झालेल्या मतदानात सरासरी 66.75 टक्के मतदान झाले होते. या मतदानानंतर सत्ताधारी भाजप व काँग्रेसमध्ये भडकलेले शाब्दिक युद्ध आता शांत झाले आहे. राज्याच्या उत्तर व मध्यभागातील 14 जिल्ह्यांत असलेल्या 93 जागांसाठी गुरुवारचे मतदान झाले. एकूण 851 उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. काही ठिकाणी ईव्हीएममध्ये गडबड झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. सकाळी थंडीमुळे गर्दी कमी होती तथापि, दुपारनंतर मात्र मोठ्या संख्येने मतदार घराबाहेर पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील राणिप मतदार केंद्रावर रांगेत उभे राहून मतदान केले. भाजपचे ज्येष्ठनेते लालकृष्ण अडवाणी, भाजप अध्यक्ष अमित शहा, पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनीही मतदान केले.

रोड शोवरून काँग्रेसची निवडणूक आयोगावर टीका
दरम्यान, साबरमतीमध्ये मतदान केल्यानंतर छोटेखानी रोड शो करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करत निवडणूक आयोग हे भाजपच्या हातातील कळसूत्री बाहुले असल्याची टीका काँग्रेसने केली. निवडणूक आयोग भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचेही काँग्रेसने म्हटले आहे. मतदार असल्याने मोदी यांनी मतदानाचा हक्क बजावला. साबरमतीतील मतदान केंद्रातून बाहेर आल्यावर त्यांनी हा रोड शो घेतला. मोदींनी कारच्या फुटबॉर्डवर उभे राहून लोकांना अभिवादन केले. सुमारे 300 मीटरपेक्षा जास्त अंतरापर्यंत ते पुढे गेले. त्यांना पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाले. भाजपचे झेंडेही यादरम्यान दिसत होते. या रोड शोवरुन काँग्रेसने दुपारी पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांनी भाजप, नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगावर हल्लाबोलच केला. गुजरातमध्ये पंतप्रधानच मतदान केल्यावर रोड शो करणार असतील तर यातून दुसर्‍या लोकांना काय प्रेरणा मिळणार?, सर्रास नियम पायदळी तुडवले जात आहेत आणि हा प्रकार देशातील जनतेच्या डोळ्यांदेखत सुरु आहे, असे अशोक गहलोत यांनी सांगितले. मोदींनी आचारसंहितेचे उल्लंघन केले असून या प्रकरणात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करु, असे त्यांनी नमूद केले. गुजरातमध्ये ज्या पद्धतीने भाजप आणि नरेंद्र मोदींना जनतेने नाकारले आहे, ते पाहून भाजपने पराभव स्वीकारल्याचे दिसते, असा टोला रणदीप सुरजेवाला यांनी लगावला.