गुजरातेतील वडवलीत दंगल; वाहने, घरांची जाळपोळ

0

अहमदाबाद। गुजरातमधील पाटण जिल्ह्यात क्षुल्लक कारणावरुन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादाने दंगलीचे रुप धारण केले. वडवली गावात 12 हून अधिक घरे जाळण्यात आली असून भीती पोटी ग्रामस्थांनी गावाबाहेर स्थलांतराला सुरुवात केली आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सध्या दहावीच्या परिक्षा सुरु आहेत. पेपर सुटल्यावर विद्यार्थी जिना उतरत होते. एक विद्यार्थी जिन्यावरुन पडला.

विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. विद्यार्थ्यांनी ही माहिती ग्रामस्थांना देताच पाच हजार लोकांच्या जमावाने वडवली गावात अक्षरशः धुडगूस घातला. जमावाने 12 हून अधिक घरांमध्ये तोडफोड केली तर 20 हून अधिक घरांना पेटवून दिले. असंख्य वाहनेही जाळण्यात आली. या दंगलीत एका तरुणाचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधूराच्या नळकांड्या फोडल्या. हवेत गोळीबारही करण्यात
आला.