गुजरातेत रात्रीस खेळ चालणार!

0

रात्रीच होणार मतदान मशीन घोटाळा : हार्दिक पटेल

अहमदाबाद : शनिवार आणि रविवारी रात्रीच मतदान यंत्रांमध्ये गडबड घोटाळा होणार असल्याचा ठाम दावा पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याने केला आहे. मतदान यंत्रात घोटाळा न केल्यास भाजप फक्त 82 जागांपर्यंत मजल मारू शकेल, असे भाकित करीत हार्दिकने खळबळ उडवली. भाजपने मतदान यंत्रात छेडछाड करून अनेक निवडणुका जिंकल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यात गुजरातमध्येही भाजप मोठा मतदान यंत्र घोटाळा करण्याच्या तयारीत असल्याचे हार्दिकने म्हटले. अस्तित्वाचा प्रश्न असल्याने गुजरातची निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे यंत्रांमध्ये गडबड घोटाळा करून ते ही निवडणूक जिंकतील. पण संशयाला जागा नको म्हणून हिमाचल प्रदेशमध्ये हरतील, असे तार्कीकही त्याने मांडले आहे.

गडबड झाली नाही तर भाजपला 82 जागा
गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल 18 डिसेंबररोजी येणार आहे. ईव्हीएमशी छेडछाड करून अनेक निवडणुका जिंकल्याचा आरोप विरोधकांनी भाजपवर केला होता. तोच धागा पकडून, गुजरातमध्येही भाजप मोठा ईव्हीएम घोटाळा करण्याच्या तयारीत असल्याचे हार्दिक पटेलने सांगितले. 18 डिसेंबरच्या आधी म्हणजेच शनिवारी आणि रविवारी रात्री भाजप ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करणार आहे, असा दावा हार्दिक पटेलने केला. शनिवारी ट्विटच्या माध्यमातून हार्दिकने भाजपावर हे आरोप केले आहेत. शनिवारी आणि रविवारी रात्री भाजप ईव्हीएम मशीनमध्ये मोठी गडबड करायला चालले आहेत. ते निवडणूक हरणार आहे. ईव्हीएमध्ये गडबड झाली नाही तर भाजपला 82 जागा मिळतील, असेही हार्दिकने ट्विटमध्ये नमूद केले आहे. मतदानासाठी ईव्हीएम वापरूनही निकालाला 5-7 दिवस लागत असतील, तर त्यापेक्षा मतपत्रिका वापरणे जास्त चांगले, अशी सूचक टिप्पणीही त्याने केली.

निवडणूक आयोग दखल घेऊ शकते
गुजरातच्या जनतेने त्यांचा कौल मतपेटीत बंद केला असून नेमके काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनेक एग्झिट पोल्सनी भाजपचीच सत्ता येईल असे भाकित वर्तविले आहे. गुजरातची विधानसभा निवडणूक हा भाजपसाठी प्रतिष्ठेचा विषय आहे. त्यामुळे 18 डिसेंबरच्या निकालाकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे. अशात आता इव्हीएममध्ये घोटाळा करुन भाजप जिंकणार असा गंभीर आरोप हार्दिक पटेलने केल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. हार्दिक पटेलने केलेल्या या गंभीर आरोपांना अद्याप भाजपने उत्तर दिलेले नाही. हार्दिकने भाजपवर हा थेट गंभीर आरोप केला असला तरी यामध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही त्याने अप्रत्यक्ष बोट ठेवल्याचे दिसते. यामुळे निवडणुक आयोगही हार्दिकच्या या वक्तव्याची दखल घेऊ शकते.