अहमदाबाद ।गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत चालली आहे तसतसे येथील राजकीय वातावरण तापू लागले आहे. गुजरात निवडणुकीसाठी भाजपने सर्व प्रकार अजमाविण्यास सुरूवात केली आहे. हार्दिक पटेलच्या व्हिडीओपासून पैशांचे आमीष, विविधप्रकारे विरोधकांची कोंडी, हाणामार्या असे प्रकार सुरू आहेत. त्यातच आता श्रीराम नामाचा जपही भाजप नेत्यांनी सुरू केला आहे. राहुल गांधी यांच्या सोमनाथ मंदिरातील अहिंदू नोंदीचे राजकारण करणार्या भाजपने आता शंकराचे दर्शन घेणारे राहुल आता श्रीरामाचेही दर्शन घेणार का? असा मुद्दा उपस्थित केला आहे. तर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पुढील दिवाळी राम मंदिरातच असे वक्तव्य केले आहे.
राहुल गांधी यांनी गोध्रा कत्तलीविषयी भाष्य करावे : मीनाक्षी लेखी
मीनाक्षी लेखी म्हणाल्या, जानवेधारी ब्राह्मण स्वत:ला शिवभक्त म्हणवतात. अशावेळी त्यांनी भगवान रामाविषयीचा दृष्टीकोनही स्पष्ट करायला हवा. त्यांच्या (काँग्रेस) सरकारने राम अस्तित्त्वातच नसल्याचा दावा केला होता. महापुरूषांच्या सांगण्यानुसार राम हा शिवभक्त होता व त्याने लंकेत जाण्यासाठी समुद्रावर सेतू बांधण्यापूर्वी शिवाची आराधनाही केली होती. मात्र, काँग्रेसच्या मते रामसेतू हा अस्तित्त्वातच नाही. त्यामुळे राहुल गांधींनी भगवान रामाविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी. जेणेकरून राहुल गांधी अयोध्येतील राम मंदिराविषयी काय विचार करतात, हे समजेल. तसेच त्यांनी 2002 साली गोध्रा येथे झालेल्या कारसेवकांच्या कत्तलीविषयी भाष्य करावे.
राहुल यांचा भगवान रामावरही विश्वास आहे का?
सोमनाथ मंदिरातील वादानंतर राहुल गांधी हे जानवेधारी हिंदू असल्याचा दावा करणार्या काँग्रेस नेत्यांना भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्या रविवारी वडोदरा येथील पत्रकार परिषदेत बोलत होत्या. लेखी म्हणाल्या, राहुल गांधी हे शिवभक्त असल्याचा दावा काँग्रेस नेते करतात. मात्र, शिवभक्त असलेल्या राहुल यांचा भगवान रामावरही तितकाच विश्वास आहे का? गुजरात काँग्रेसकडून ट्विटरवर नुकताच राहुल गांधी यांचा फोटो ट्विट करण्यात आला होता. या फोटोत राहुल गांधींनी कपड्याच्यावरून जानवे घातल्याचे दिसत आहे. यावरूनही मिनाक्षी लेखी यांनी काँग्रेसला टोला लगावला. राहुल गांधी हे कपड्यांच्यावरती जानवे घालणारे एकमेव ब्राह्मण असल्याचे त्यांनी म्हटले.
आयोध्येत पूजेचा मुलभूत अधिकार : स्वामी
अयोध्या येथे लवकरच राम मंदिरचे काम सुरू होणार असून पुढील दिवाळीपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी ते खुले होईल, असा दावा भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला. रामराज्य यावर बोलताना त्यांनी येत्या दिवाळीपर्यंत राम मंदिर तयार झालेले असेल, असे म्हटले. स्वामी म्हणाले, अयोध्यामध्ये पुढील वर्षी ऑक्टोबरपर्यंत राम मंदिर तयार होण्याची शक्यता आहे. सर्व काही तयार आहे असून मंदिर निर्मितीसाठी आवश्यक सामानही तयार आहे. त्यांना फक्त स्वामी नारायण मंदिराप्रमाणे जोडण्याचीच गरज आहे. त्या जागेवर पुजा करण्याचा माझा आणि हिंदू समाजाचा मुलभूत अधिकार आहे, असे मी न्यायालयाला सांगितले आहे. मुस्लिमांकडे तो अधिकार नाही. त्यांचा रस फक्त संपत्तीत असून ते सामान्य आहे. राम मंदिरच्या उभारण्यासाठी नव्या कायद्याची गरज नाही. कारण आम्ही हा खटला जिंकत आहोत आणि मला तसा विश्वासही आहे.