गांधीनगर/नवी दिल्ली : देशभर चर्चेचा विषय ठरलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान शनिवारी (दि.9) होत आहे. 182 पैकी 89 जागांसाठी हे मतदान होत आहे. मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह 977 उमेदवार रिंगणात आहेत. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी प्रचारतोफा थंडावल्या आहेत. प्रचाराच्या शेवटच्या काही तासांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या घणाघाती सभा झाल्यात. तसेच, भव्य रॅलीही काढण्यात आल्यात. या प्रचारांत मोदीविरुद्ध राहुल असा सामना रंगल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, मोदी यांना ‘नीच’ म्हणून तोंडघशी पडलेले काँग्रेसमधून निष्कासित मणिशंकर अय्यर यांच्यावर मोदी यांनी हल्ले चढविणे सुरुच ठेवले होते. मी पंतप्रधान झाल्यानंतर हेच मणिशंकर अय्यर हे पाकिस्तानात गेले होते. मला पंतप्रधान पदावरून हटविण्यासाठी पाकिस्तानी नेत्यांशी त्यांनी चर्चा केली, असा आरोप करतानाच अय्यर तुम्ही पाकिस्तानात माझी सुपारी देण्यासाठी गेला होतात काय, असा जाहीर सवालच त्यांनी केला. दुसरीकडे, मोदींवर टीका करताना, काँग्रेस उपाध्यक्ष खा. राहुल गांधी म्हणाले, गुजरातमध्ये काँग्रेसचे वादळ आलेले आहे, ते कुणीही रोखू शकत नाही. विधानसभा निवडणुकीत पक्षाचा विजय निश्चित आहे, असा दावाही राहुल यांनी उदयपूर येथील सभेत केला. या बहुचर्चित निवडणुकीच्या पूर्वसंध्येला भाजपने आपला जाहीरनामा जाहीर केला. संकल्पपत्र असे या जाहीरनाम्यास नाव दिले असून, त्यात राज्याच्या विकासावर भर दिलेला आहे. पाटीदारांना आरक्षण हे संवैधानिक नाही, असे त्यात स्पष्ट करण्यात आलेले आहे.
डॉ. मनमोहन सिंग, सोनियांवरही मोदींची टीका
भाभर येथे निवडणूक प्रचार रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अय्यर यांच्यावर बोचरी टीका केली. ते म्हणाले, मी सत्तेत येताच अय्यर पाकिस्तानात गेले आणि त्यांनी पाक नेत्यांशी चर्चा केली. मोदी सत्तेत आलेत त्यांना हटविले नाही तर भारत-पाक संबंध कधीच सुधारणार नसल्याचे त्यांनी पाक नेत्यांना सांगितले. पाकिस्तानात जाऊन हे मोदींना हटविण्याची भाषा करत होते. तिथे काय तुम्ही माझी सुपारी देण्यासाठी गेला होतात काय? असा सवाल मोदींनी केला. त्यांनी मला शिवी दिली, तुम्हाला शिवी दिली की गुजरातला शिवी दिली, त्याची मी चर्चा करणार नाही. कारण गुजरातची जनताच त्यांना 14 डिसेंबरला चोख उत्तर देणार आहे, असेही मोदी म्हणाले. जेव्हा गुजरातमध्ये पूर आला होता तेव्हा काँग्रेसचे आमदार बेंगळुरूच्या स्विमिंग पूलमध्ये पोहत होते, असा टोलाही त्यांनी लगावला. जेव्हा डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सरकार चालवित होत्या, तेव्हा युरियाच्या मुद्द्यावरून मी त्यांना अनेक पत्र लिहिली. त्याला त्यांनी एकदाही उत्तर दिले नाही. आता मी पंतप्रधान झालो. अनेक राज्यांचे मुख्यमंत्री मला पत्र लिहितात. हे मला कळताच मी अधिकार्यांना त्याबद्दल विचारले. त्यावर त्यांनी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवल्याचे तुम्हाला कसे कळले? असे मला विचारले. तेव्हा मी जनतेतून काम करत पुढे आलो आहे, वरून मला कोणी पाठवले नाही. त्यामुळे मला सर्व गोष्टी समजतात, असे त्या अधिकार्यांना बजावल्याचे मोदी म्हणाले.
भाजपकडून संकल्पपत्र जाहीर!
गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास उरले असतानाच भाजपने ज्यांचा जाहीरनामा म्हणजेच ’संकल्प पत्र’ सादर केले. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले, की गुजरात हे उत्पादनाच्या बाबतील देशातील सर्वाधिक विकासदर असलेले राज्य आहे. काँग्रेसचा जाहीरनामा हा घटनात्मक आणि आर्थिकदृष्ट्यादेखील अशक्य आश्वासनांचा भरणा असल्याची टीकाही यावेळी जेटली यांनी केली. काँग्रेस सत्ता मिळवण्यासाठी राज्यातील जनतेला खोटी आश्वासने देत असून, राज्याला विकासाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी एकता राहावी हा भाजपचा मूळ उद्देश आहे. काँग्रेसने समाजांमध्ये दुफळी माजवून कितीही सामाजिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा त्यांना तोटाच होईल, असेही जेटली म्हणाले.
सरकार आल्यास शेतकर्यांना कर्जमाफी
गुजरातमध्ये काँग्रेसचे वादळ आले आहे. ते कुणीही रोखू शकत नाही. विधानसभा निवडणुकीत पक्षाचा विजय नक्की आहे, असा दावा पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. छोटा उदयपूरमधील प्रचारसभेत ते बोलत होते. जीएसटीच्या मुद्द्यावरून भाजपवर वारंवार वार करणार्या राहुल यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. जीएसटी म्हणजे ’गब्बर सिंह टॅक्स’ आहे, असे ते पुन्हा म्हणाले. काही उद्योगपतींच्या फायद्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’गब्बर सिंह’ची मदत घेतली, असा आरोपही त्यांनी केला. गुजरातमध्ये एका आईला मुलाला इंजिनिअर करण्यासाठी लाच द्यावी लागते, असे भावनिक विधानही त्यांनी केले. गुजरातमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यास 10 दिवसांच्याआत शेतकर्यांना कर्जमाफी देणारी योजना आणण्यात येईल, असे आश्वासनही राहुल यांनी दिले. सध्या शेतकर्यांची अवस्था बिकट आहे आणि मोदींनी 10 उद्योगपतींचे 1 लाख 30 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, असा आरोपही त्यांनी केला.