मुंबई । गुजरात आणि महाराष्ट्रातील 125 क्राफ्ट मिल नजीकच्या भविष्यकाळात बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पुनर्वापर प्रक्रियेच्या कागदासाठी परदेशातून होणार्या टाकाऊ कागदाच्या आयातीवर भारत चीन मुख्यतः अवलंबून आहेत. मात्र परदेशात टाकाऊ कागदांचा वापर वाढल्याने कच्चा मालाच्या किमती 35 टक्क्यांनी वाढल्या आहेत. परिणामी पेपर मिल्सना किलोमागे 6 रुपयांचे नुकसान होत आहे. हा तोटा भरून न काढल्यास वार्षिक 12000 कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या गुजरात आणि महाराष्ट्रातील पेपर मिल्स बंद होणार आहेत.
अनेक वर्षापासून मंदीचे सावट
गुजरात पेपर मिल्स असोशिएशनचे अध्यक्ष सुनील अग्रवाल यांनी नमूद केल्यानुसार हे क्षेत्र बर्याच काळापासून मोठया प्रमाणावर मंदीचा सामना करत आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातील कारखाने 20 लाख टन टाकाऊ कागद आयात करत आहेत. मात्र अमेरिकेत वर्जिन फायबरच्या जागी टाकाऊ कागदांचा पुनर्वापर वाढल्याने भारत आणि चीन मधील टाकाऊ कागदांची आयात कमी झाली. त्यामुळे गेल्या 2 महिन्यात टाकाऊ कागदांच्या किमतीत 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच कारणामुळे भविष्यकाळात 125 पेपर मिल्स बंद होऊन सुमारे 40 हजार कर्मचार्यांवर बेरोजगारीची कुर्हाड ओढविण्याचे संकट आहे.