हैदराबाद । प्रो लीग कबड्डी स्पर्धेतील पाचव्या सत्रात चार नवीन संघ आले आहेत. त्यातील हरियाणा स्टीलर्स आणि तामिळ थलैवास या दोन संघाना पहिल्या सामन्यातून विजयाची बोहनी करता आली नाही. मंगळवारी होणार्या लढतींमध्ये उर्वरीत दोन संघ पहिल्यांदा मैदानात उतरणार आहेत. पहिल्या सामन्यात गुजरात फॉर्च्युन जायंटसचा सामना दबंग दिल्लीशी होईल. दुसर्या लढतीत युपी योद्धास संघासमोर तेलगु टायटन्सचे आव्हान आहे. लीगमधील जुन्या संघासमोर हे दोन नवे संघ विजयी सलामी देणार का याची सगळ्यांना उत्सुकता आहे.
दबंग दिल्लीचा दबदबा
अ गटात असलेल्या दबंग दिल्लीने लीगमध्ये विजयी सुरुवात केली आहे. यंदाच्या सत्रात या संघाचा पहिला सामना जयपुर पॅथर्स संघाशी झाला. सुरुवातीला खेळाडूंमध्ये ताळमेळ नसल्याने दिल्ली दंबगचा संघ पिछाडीवर पडला होता. इराणच्या अबोफझलच्या आक्रमक चढाया आणि निलेश शिंदे, बाजीराव होडगे आणि सुनीलकुमारने चांगला बचाव केला.शेवटच्या मिनीटांमध्ये निलेश शिंदेने हाय फाईव्ह गुण मिळवल्याने सामन्याचा निकाल दबंग दिल्लीच्या बाजूने लागला. गुजरात फॉर्च्युन जायटंस संघ लीगमध्ये नवीन असला तरी त्यांच्या खेळाडूंना लीगमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे या संघाविरुद्ध खेळताना दंबग दिल्लीच्या खेळाडूंना पहिल्या सामन्यातील चुका टाळाव्या लागतील.
विजयाची प्रतिक्षा
तेलगु टायटन्स हा लीगमधील अनुभवी संघ आहे. पण या संघाला अजून घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा उचलता आलेला नाही. संघाने आतापर्यत तीन सामने खेळले असून त्यातील फक्त एकच सामना त्यांना जिंकता आलेला आहे. प्रत्येक सत्रात विजेतेपदाची दावेदारी सांगणार्या या संघाला आता सावधगिरीने वाटचाल करावी लागेल. दुसरीकडे युपी योद्धाजचा कर्णधार नितीन तोमर आक्रमक चढायांसाठी ओळखला जात असला तरी त्याच्या बचाव करण्याची तंत्राची फारशी कोणी दखल घेतलेली नाही. त्यामुळे हा संघही यजमान संघाच्या पराभवाची संख्या वाढवू शकतो.