नंदुरबार । दे शातील विविध संशोधन केंद्रामध्ये या विषयी संशोधन सुरु आहे. हे संशोधन शेतकर्यांपर्यंत किती पोहोचले, त्या संशोधनाची अंमलबजावणी प्रत्यक्षात करताना शेतकर्यांना आलेल्या अडचणी, अनुभव तसेच त्यातून झालेले फायदे याबाबत सांगोपांग चर्चा करण्यासाठी आनंद (गुजरात) येथील आनंद कृषि विद्यापीठात राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत चार राज्यातील 45 शेतकरी आमंत्रित होते, त्यात नंदुरबार जिल्ह्यातील शेतकर्यांनी सादरीकरण केले.
चार राज्यातील शेतकरी सहभागी
यात जल आणि मृदसंधारणाच्या विविध उपाययोजना राबविण्या-या गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, गोवा या चार राज्यातील 45 शेतक-यांना आमंत्रित करण्यात आले. या परिषदेत नंदुरबार जिल्ह्यातील विनोद शहा, कानडी (शहादा )तसेच कृष्णा कोकणी, निंबोणी(ता. नवापुर ) सहभागी झाले होते. यावेळी या परिषदेत विनोद शहा यांनी आपल्या शेतात जल व मृदसंधारणासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांची – मुलस्थानी जलसंधारण ,शेताची बांधबंदिस्ती, उताराला आडवी लागवड व मशागत, रुंद वरंबा आणि सरी पद्धतीने लागवड, विविध आंतरपीकांची लागवड, उसाच्या पाचटाचे शेतातच कुजविणे, शेततळे, तुषार व ठिबक सिंचनातून पाण्याचा कार्यक्षम वापर, सुपीकता टिकविण्यासाठी गांडूळ खताचा वापर इत्यादी उपाययोजनांचे सादरीकरण केले.
अल्पावधीत प्रगती
उसाचे पाचट लवकर कुजावे यासाठी उसाच्या पाचटावर माती टाकणे गरजेचे असते. त्यासाठी विनोद शहा यांनी वैष्ट्यपूर्ण बनविलेल्या यंत्राचा व्हीडोओ यावेळी दाखविण्यात आला. निंबोणी येथील युवक शेतकरी कृष्णा अशोक कोकणी यांनी आपल्या शेतात केलेल्या विहीर पुनर्भरण, समतलीकरण, शेतातून वाहनार्या नाल्याच्या पाण्याचा भात शेतीसाठी उपयोग, शेताची बांधबंदिस्ती या उपाययोजनांची सविस्तर माहिती सादर केली. उपाययोजनांमुळे शेतातील पाण्याची उपलब्धता वाढल्याने भाजीपाला शेतीकडे वळून वर्षभर उत्पादनाचे भाजीपाल्याचे वार्षिक चक्र बसविले. तुषार सिंचन तसेच कांदा ,लसून आणि भाजीपाला उत्पादनासाठी ठिबक सिंचनपद्धतीचा वापर करून पाण्याच्या कार्यक्षम वापराकडेही कटाक्ष असतो. अशा वैशिट्यपूर्ण शेतीतून मिळालेल्या नफ्यातून ट्रक्टरची खरेदी, शेतीची सुधारणा या विषयी त्यांनी उपस्थिताना माहिती दिली. अल्पावधीत शेतीत कृष्णाने केलेल्या प्रगतीची उपस्थितांनी प्रशंसा केली.
शेतकर्यांचा सन्मान
अशा प्रयोगशील शेतकर्यांचा सत्कार भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे महानिर्देशक डॉ. त्रिलोचन महोपात्रा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भारतीय मृद व जलसंधारण संधोधन संस्थेचे डॉ. अनुपम मिश्रा आणि देशभरातील मृद व जलसंधारणातील शास्त्रज्ञ उपस्थित होते. यावेळी या परिषदेत कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबारचे विषय विशेषज्ञ जयंत उत्तरवार, पदमाकर कुंदे, राजेश भावसार यांची उपस्थिती होती.