गुजरात, हिमाचल प्रदेशात ‘कमळ’च फुलणार!

0

नवी दिल्ली : गुजरात व हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे मतदान सायंकाळी पाच वाजता संपल्यानंतर विविध वृत्तवाहिन्या व सर्वेक्षण संस्थांनी आपले निवडणूक निकालपूर्व अंदाज (एक्झिट पोल) जाहीर केले. या अंदाजानुसार, गुजरातमध्ये पुन्हा भारतीय जनता पक्षाचीच सत्तावापसी होणार असून, हिमाचल प्रदेशातून काँग्रेस सत्तेबाहेर फेकली जाणार आहे. या दोन्ही राज्यांत कमळच फुलणार असल्याचे अंदाज आल्याने भाजप नेतृत्वाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. बहुचर्चित गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला 182 पैकी 112 जागा तर काँग्रेसला 71 जागा मिळतील असा अंदाजही सर्वेक्षण संस्थांनी वर्तविलेला आहे. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 92 जागा जिंकून गुजरातमध्ये भाजपला पुन्हा सत्ता स्थापन करता येईल, असे अनुमानही राजकीय तज्ज्ञांनी काढले आहे. दुसरीकडे, प्रसिद्ध राजकीयतज्ज्ञ योगेंद्र यादव यांनी मात्र गुजरातमध्ये भाजपला बहुमताइतक्याही जागा मिळणार नाहीत, असा अंदाज व्यक्त केला असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या दोन्हीही राज्यात काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा केला आहे. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 9 डिसेंबरला तर दुसर्‍या टप्प्यात 14 डिसेंबररोजी मतदान घेण्यात आले आहे. तर हिमाचल प्रदेशात 9 नोव्हेंबरला मतदान घेण्यात आलेले आहे. या दोन्ही राज्यांची मतमोजणी 18 डिसेंबररोजी होणार आहे.

काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य जाणार?
हिमाचल प्रदेशात काँग्रेसला दारूण पराभवाचा धक्का बसेल आणि भाजपच्या पारड्यात स्पष्ट बहुमताचे दान पडेल असा कौल मतदानोत्तर जनमत चाचण्यांमधून मिळाला आहे. या ’एक्झिट पोल’नुसार निकाल लागल्यास काँग्रेसच्या हातून आणखी एका राज्याची सत्ता निसटणार आहे. टाईम्स ऑफ इंडिया आणि सी व्होटरच्या जनमत चाचणीनुसार, हिमाचल प्रदेशात विधानसभेच्या 68 जागांपैकी 41 जागा जिंकून भाजप बहुमताचा आकडा सहज पार करेल अशी शक्यता आहे. 35 हा बहुमताचा जादुई आकडा असून, भाजपला त्यापेक्षा किमान सहा अधिक जागा मिळतील, असा अंदाज आहे. भाजपला सरासरी 49 जागांचा अंदाज अन्य सर्वेक्षण संस्थांनी वर्तविला आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या पदरी मात्र आणखी एक अपयश पडण्याची चिन्हे आहेत. हा कौल लक्षात घेता काँग्रेस 25 जागांपर्यंतच मजल मारणार आहे. तर काही संस्थांच्या अंदाजानुसार काँग्रेसला 18 जागा मिळतील. दोन जागा अन्य पक्षांच्या पारड्यात जाणार आहेत. 2012च्या निवडणुकीचा विचार केल्यास तेव्हा काँग्रेसला 36 तर भाजपला 26 जागा मिळाल्या होत्या. भाजपला यावेळी 15 जागांचा फायदा होईल तर काँग्रेसच्या हातून 11 जागा निसटतील अशी शक्यता आहे. अन्य पक्षांना गेल्यावेळी सहा जागा मिळाल्या होत्या तो आकडा दोनवर येणार आहे.

गुजरातमध्ये भाजपच्या सत्तेची हॅट्ट्रीक?
गुजरातमध्ये टाइम्स नाऊ-व्हीएमआर यांनी संयुक्तरीत्या घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गुजरातमध्ये 89 जागांसाठी 9 नोव्हेंबररोजी पहिल्या टप्प्यासाठी मतदान झाले होते. तर उर्वरित 93 जागांसाठी दुसर्‍या टप्प्यातील मतदान गुरुवारी झाले. मतदानोत्तर चाचण्यांनुसार, भाजपला 182 जागांपैकी 108 ते 115 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेसला 71 जागांवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. तर इतरांना दोन ते तीन जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली. टाइम्स नाऊ-व्हीएमआरने सोशल मीडियाच्या आधारे हा एक्झिट पोल घेतला आहे. गुजरात विधानसभा ताब्यात घेण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने या दोन्ही पक्षांनी सर्व ताकद पणाला लावली होती. भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी जोरदार प्रचार केला होता. या राज्यात भाजप 22 वर्षं सत्तेत आहे. तर काँग्रेसला 22 वर्षांनंतर पुन्हा एकदा सत्ता मिळवण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. 2012च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 182 पैकी 115 जागा मिळवण्यात यश आले होते. त्यातील 6 जागा कमी होऊन भाजपला 109 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर काँग्रेसकडे 2012च्या निवडणुकीत 61 जागा होत्या. या जागांमध्ये 9 जागांची भर पडून काँग्रेसला 70 जागा मिळण्याची शक्यता आहे.

गुजरातबाबत विविध वृत्तवाहिन्यांचे अंदाज
सर्वेक्षण संस्था                              एकूण जागा       भाजप         काँग्रेस   +   इतर
टाईम्स नाऊ-व्हीएमआर                  182                115             65                2
रिपब्लिक-सी व्होटर                        182                108             74               0
न्यूज 18-सी व्होटर                           182                108             74              0
सरासरी अंदाज                                182                112              70              0

बहुमतासाठी जागा – 92

हिमाचल एक्झिट पोल
एकूण जागा : 68
भाजप : 49
काँग्रेस : 18
इतर : 01
बहुमतासाठी आवश्यक : 35