नवी मुंबई । राज्य शासनाची सक्तीची बंदी असतानाही पनवेलसह राज्यात सर्वत्र गुटखा विक्री तेजीत सुरू असल्याने व्यसनाधिनता वाढीस लागली आहे. प्रामुख्याने गुटखाच्या आहारी जाणार्यांमध्ये तरूणांचा समावेश जास्त आहे. नव्या वर्षाच्या प्रारंभीच ‘गुटखा मुक्त पनवेल’, ची संकल्पना राबवून ती अंमलात आणण्याचा निर्धार पनवेल संघर्ष समितीने केला आहे. अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस यंत्रणेच्या सहकार्याने काही दिवसातच हा संकल्प तडीस नेण्याचा निर्धार संघर्षचे अध्यक्ष कांतीलाल कडू आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी मनावर घेतला आहे. पनवेल शहर, महापालिका क्षेत्रासह तालुक्यातील गावोगावी, नाक्यानाक्यावर गुटख्याची बेकायदेशीर विक्री चढ्या भावाने सुरू आहे. राज्य शासनाच्या बंदी आदेशाची सर्रासपणे पायमल्ली होत आहे. त्यातच गुटखा विक्रीमुळे तरूण मोठ्या प्रमाणात कॅन्सरसारख्या महाभयानक आजाराचे बळी ठरत आहेत. याविषयी समाजात जनजागृती करून गुटखा बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पनवेल संघर्ष समितीने पाऊल उचलले आहे.
रायगड जिल्हा अन्न व औषध प्रशासनाचे प्रमुख दिनेश संगत, पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे, पोलिस आयुक्त हेमंत नगराळे याशिवाय महाराष्ट्र पोलिस महासंचालकांचीही याबाबतीत मदत घेवून नवीन वर्षाचा संकल्प म्हणून पनवेल तालुका गुटखा मुक्त करण्याचा मानस केला असल्याची माहिती कांतीलाल कडू यांनी दिली आहे. महाराष्ट्र भूषण डॉ. अभय बंग यांच्याशी कडू यांनी दोन वर्षापूर्वी संपर्क साधला होता. डॉ. बंग यांनी चंद्रपूर जिल्हा तंबाखू मुक्त करण्याचा संकल्प त्यावेळी केला होता. कडू यांना त्यांनी, रायगड जिल्ह्यात व्यसनाधितेला बळी पडणार्या तरूण पिढीला वाचविण्यासाठी काही ठोस कामगिरी करण्याचे सुचित केले होते. व्यसनमुक्तीचे रायगडात रेवदंडा येथे मोठे केंद्र आहे. पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांची इच्छाशक्ती असलेल्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने रायगडसह देश, विदेशात व्यसन मुक्तीसाठी मोठे योगदान दिले आहे.